गावपण जपत, विकासाची कास धरणारे रहाटणी 
--------------------------------

गावपण जपत, विकासाची कास धरणारे रहाटणी --------------------------------

ग्रुप ग्रामपंचायत, पवना नदीतून होडीने ये-जा, रॉकेलचे कंदील असलेले पथदिवे, गाव दिसणार नाही, अशी चोहो बाजूंनी झाडी, उदरनिर्वाहासाठी शेती, जोडीला दुग्धव्यवसाय, खडकी दारूगोळा कारखान्यात व हिंदुस्थान अँटिबायोटिक्स औषध निर्माण कारखान्यात नोकरी करणारे भूमिपुत्र असा इतिहास रहाटणी गावाला आहे. गेल्या तीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून गावाचे रूप पालटते आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही भाग ‘स्मार्ट’ होत असताना विकासाची कास धरली आहे. रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि दळणवळणाच्या सुविधांमुळे गावाला पसंती मिळत आहे.
- रवींद्र जगधने

रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव अशी तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत होती. पिंपळे सौदागरला कार्यालय होते. १९६५ च्या सुमारास रहाटणीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. पवना नदीकाठी वसलेल्या गावात प्रमुख व्यवसाय शेती होता. मोठ्या प्रमाणात बागायती होती. पवना नदीतील पाणी शेतकरी वापरायचे. कांदा हे प्रमुख पीक घेतले जाई. शेतीबरोबर दुग्धव्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जायचा. प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई-म्हशी होत्या. शाळा मंदिरात भरायची. पुढे जिल्हा परिषदेने कौलारू इमारत बांधली. बालवाडी ते चौथीपर्यंत वर्ग सुरू झाले. पुढील शिक्षणासाठी मुलांना पिंपरी गावात जावे लागायचे. पवना नदीवर पूल नसल्याने होडीतून ये-जा करावी लागत असे. नदीला पूर आल्यास गावाला पाण्याचा वेढा पडायचा.

महापालिकेनंतर विकासाला गती
१९८२ च्या सुमारास गावाचा समावेश महापालिकेत झाला. त्यानंतर गावाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. शेतीला सोन्याचे भाव आले. अनेकांनी एमआयडीसीतील कामगारांना तुकड्यांनी शेती विकली. काही जण बांधकाम व्यवसायात उतरले. लोकवस्ती वाढत असल्याने अनेकांनी विविध व्यवसाय सुरू केले. त्यातूनच गावाच्या विकासाला चालना मिळाली.

प्रशस्त रस्ते व टोलेजंग इमारती
रहाटणी आता गाव राहिले नसून, उपनगर बनले आहे. प्रशस्त रस्ते, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. गावकऱ्यांची जीवनशैलीच बदलली आहे. अनेकांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. प्रचंड लोकसंख्या वाढली आहे. गावातील काही भूमिपुत्रांनी आजही शेती ठेवली आहे.

धार्मिक कार्यक्रम
ताईबाई राजवाडे यांनी १९३७ मध्ये गावात श्रीराम मंदिर बांधले. त्याचा जीर्णोद्धार १९९८ मध्ये अंकुश राजवाडे व शिवाजी राजवाडे यांनी केला. तेव्हापासून मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत कीर्तन, भजन आदी कार्यक्रम चालतात. रामनवमीला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद असतो.

गावातील पहिलवान
गावात दोन तालीम होत्या. त्यात शिवा नढे व चिखलीतील बाजीराव नेवाळे हे पहिलवान घडवत असत. याच तालमीतून तुळशीदास नखाते, शिवराम बोरडे, रामचंद्र काळे, राम नढे, भाऊसाहेब नखाते, श्रीराम कोकणे आदी मल्ल पंचक्रोशीत नावारूपाला आले होते.

गावाविषयी थोडेसे...
घराणे ः राजवाडे, नढे, नखाते, तापकीर, तांबे, कोकणे, गोडांबे, शिंदे, खुळे, काळे, कापसे, थोपटे, भालेराव, शिनगारे
मंदिरे ः श्रीराम मंदिर, शंकर मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, महालक्ष्मी मंदिर असून, जुन्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे
यात्रा-उत्सव ः चैत्र वैद्य अष्टमीला भैरवनाथ यात्रा भरते. काठी व पालखी मिरवणूक, ढोलताशा व लेझीम खेळ, लोकनाट्य व कुस्तीचा आखाडा असतो
---------------
ॊॊॊॊॊॊॊाॆॊॊॊॊाॆाॆाॆमाझा जन्म १९४२ मधील आहे. तेव्हापासून गावाचा बदल पाहतो आहे. चिखलातील रस्ता, मातीच्या विटांची घरे, मंदिरातील शाळा ते सर्व सुखसुविधा असलेल्या रहाटणी गावाचे बदललेले रूप पाहिले आहे.
मात्र, अजूनही गावात धार्मिक
कार्यक्रम, यात्रा गावकरी एकोप्याने साजरे करतात.
- अंकुश राजवाडे, स्थानिक ग्रामस्थ

काही वर्षांपूर्वी आम्ही रहाटणीत राहण्यास आलो. आम्हाला वाटतही नाही की काही वर्षापूर्वी हे छोटेसे गाव होते. बराच विकास आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला आहे. यामध्ये सर्वांचाच वाटा आहे. आमच्या सोसायटीचे नावही रहाटणी नावावरूनच घेतले आहे. रहाटणीत राहतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
- डॉ. काजल पांडे, नागरिक
---
फोटोः 7697

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com