पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक श्रीमंती 
डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी

पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक श्रीमंती डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवडला मिळाला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी १९९९ मध्ये ७९ वे नाट्य संमेलन झाले होते. येथील रसिकांना नव्या वर्षाची मिळालेली ही अनमोल भेट आहे.
-------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे जुळे शहर आणि उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. आपल्या या परिसराला फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याचा दरवळ आणि त्यांच्या देहू-आळंदीचे सानिध्य लाभलेली ही पुण्यभूमी तर संत मोरया गोसावी यांच्या आध्यात्मिक कार्याची ही कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्यानं भारलेल्या मावळ्यांची ही शिवभूमी आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांच्या वास्तव्याच्या आणि विचारांच्या प्रवाहात न्हालेली ही समताभूमीदेखील आहे. म्हणूनच या नाट्य संमेलनाला एक विशेष ऐतिहासिक औचित्य लाभलं आहे.

पिंपरी येथे जानेवारी २०१६ मध्ये ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. पिंपरी-चिंचवड शहराला हा मान पहिल्यांदाच मिळाला होता. देशातील ११ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांनी या संमेलनात सहभाग दिला. कवी गुलजार, जावेद अख्तर, चेतन भगत यांच्यासारखे दिग्गज संमेलनाला उपस्थित होते. चार दिवसांच्या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या संमेलनाला आठ लाख रसिकांनी भेट दिली. सहा कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. त्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला. या साहित्य संमेलनानंतर आपल्या या उद्योगनगरीची साहित्यिक ओळख अधिक ठळकपणे पुढे आली. आपल्या शहरात शंभरावे नाट्य संमेलन व्हावे, अशी माझ्या मनात इच्छा होती. भाऊसाहेब भोईर यांच्या प्रयत्नांमुळे तो क्षण आता साकार होत आहे.

पिंपरी-चिंचवड नगर पालिकेची स्थापना ते सध्याच्या महानगरपालिकेपर्यंतच्या प्रवासाचा मी गेली ३० ते ३५ वर्षे साक्षीदार आहे. उद्योगांमुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या सर्व भागातून लोक येथे स्थायिक झाले आहेत. आपल्यासोबत त्यांनी आपापली संस्कृती इथं आणली.

साठच्या दशकात चिंचवडला अजंठा थिएटर सुरू झालं. त्याचा उपयोग नाट्यगृहासारखा देखील व्हायचा. पुढे दर्शन हॉल झाला. हा हॉल छोटा असला तरी तिथं असणाऱ्या सोयींमुळं अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि व्यावसायिक नाटके या ठिकाणी व्हायची. १९९४ पासून पिंपरी-चिंचवड नाट्यगृह झाल्यानंतर गेली ३० वर्षे ते आपल्या शहराचे सांस्कृतिक केंद्र आहे. कामगार नाट्य स्पर्धांमध्ये पिंपरीतून अनेक कलाकार पुढे आले आहेत. टेल्को कंपनीत कलासागर, बजाज ऑटोमध्ये कलामंच, नाट्य षटकार पिंपरी, नाट्यसिंधू, चिंचवड विकास मंडळ, अक्षय नाट्यसंस्था, अभिनय कलामंदिर अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून कलाकार तयार झाले आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांमुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले.

उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवडचा उल्लेख एके काळी देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असा केला जायचा. गेल्या तीस वर्षांच्या काळात उद्योगासोबतच शिक्षण, साहित्य, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात या शहरानं मारलेल्या उत्तुंग भरारीमुळे आपण सांस्कृतिक क्षेत्रात देखील श्रीमंत बनलो आहोत.

मराठी रंगभूमी हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा रंगमंचावरच्या तसेच पडद्यामागच्या आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांसह सगळ्या लोकांचे कर्तृत्व आपण त्या दोन शब्दांमध्ये गुंतवलेले असते. मराठी रंगभूमी याचा अर्थ नाटक जिवंत ठेवणारी सर्व मंडळी असा आहे. सगळ्यांचा मिळून हा सोहळा चाललेला असतो.

थोर लेखक, नाटककार आणि स्वतः कलाकार असलेले पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात म्हटलं होतं की, सगळ्या कलांमध्ये सर्वांत कठीण कला नाट्यकला आहे. अतिशय बिकट असली तरी माणसाच्या स्वभावाशी सगळ्यांत जुळणारी कला नाट्यकला आहे.

हे संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा किंवा प्रायोजक मंडळींची आहे असे मी मानत नाही. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे संमेलन म्हणजे अभिमानाचा सोहळा आहे. संमेलन अभूतपूर्व होईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

हे संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा किंवा आम्हा प्रायोजक मंडळीची नाही. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा अभिमानाची घटना आहे. येथील सर्व पत्रकार तसेच माध्यमांनी यापूर्वीच्या कार्यक्रमांना खूप चांगली प्रसिद्धी दिलेली आहे. या संमेलनाला देखील ती मिळेल अशी खात्री आहे. हे संमेलन अभूतपूर्व होईल, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com