मावळसाठी उद्या मतदान साहित्य वितरण 
विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणांहून प्रक्रिया सुरू होणार

मावळसाठी उद्या मतदान साहित्य वितरण विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणांहून प्रक्रिया सुरू होणार

पिंपरी, ता. १० : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या सहा ठिकाणांहून रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघांत पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.‌ त्यांच्या सहायक निवडणूक अधिकारीपदी अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांची नेमणूक केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आधिपत्याखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय विविध निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तसेच मतदान साहित्य वितरण व स्वीकृतीसाठी सूक्ष्म नियोजन देखील केले आहे. मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहने आणि इतर व्यवस्थेचा आराखडा तयार असल्याचे सिंगला यांनी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून, दोन हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी नऊ हजार २३६ बॅलेट युनिट, तीन हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि तीन हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रे लागणार आहेत.

विधानसभा क्षेत्रानुसार नियोजन
पनवेल विधानसभा : ५४४ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए. आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथून होईल.
कर्जत विधानसभा : ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून होईल.
उरण विधानसभा : ३४४ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी. बी. पाटील मंगल कार्यालयातून होणार आहे.
मावळ विधानसभा : ३९० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथून होईल.
चिंचवड विधानसभा : ५४९ मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून होईल.
पिंपरी विधानसभा : ४०० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर ऍन्ड रिसर्च सेंटर येथून होईल.

असे होईल साहित्य वितरण
रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून मतदान साहित्य वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाईल. साहित्य वितरणाच्या ठिकाणी साहित्य वाटपासाठी मतदान केंद्रनिहाय टेबल तयार करण्यात येणार आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येईल. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेतली जाईल. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात येतील. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. निवडणूक साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी स्वतंत्र कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.

वाहनांना जीपीएस प्रणाली
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसगाड्या, २१९ एसटी महामंडळाच्या बसगाड्या, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, जीपीएस प्रणालीदेखील बसवली जाणार आहे.

‘‘कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असेल. नियोजित मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्य वितरण करताना योग्य समन्वय ठेवून, मतदान साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर सुस्थितीत पोहोचेल याची दक्षता पोलिस घेतील.
- दीपक सिंगला, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com