आठ कोटी खर्चून नूतनीकरण; तरीही सुविधांची वानवा

आठ कोटी खर्चून नूतनीकरण; तरीही सुविधांची वानवा

जुनी सांगवी,ता. १५ ः सुमारे आठ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेल्या महापालिकेचा कै.बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव अवघ्या एक महिन्याच्या आतच समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि सुविधांची वानवा असल्याने जलतरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांगवीतील जलतरण तलाव नूतनीकरणाचे काम करून खुला करण्यात आला. किरकोळ कामे झालेली नसतानाही या जलतरण तलावाचे घाईघाईत उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतरही येथील किरकोळ दुरुस्ती कामांमुळे नागरिकांना महिनाभर आणखी प्रतिक्षा करावी लागली.
नूतनीकरण करताना नियोजनाच्या अभावामुळे अनेक जुनी कामे ‘जैसे थे’ ठेवून रंगरंगोटी करण्यात आली. अनावश्यक स्ट्रक्चरल कामात सावलीसाठी टाकलेले छत, पिण्याच्या पाण्याची जुनी नादुरुस्त वाहिनी तशीच ठेवण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात येथून पाणी गळती होत होती. निसरड्या, कमकुवत फरशांमुळे येथील दोनदा दुरुस्ती केली असल्याचे स्थानिक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

काय आहेत समस्या...
- महिन्याभरातच बाक तुटले
- कपडे, बॅगा ठेवण्यासाठी लॉकरचा अभाव
- अपुरी बैठक व्यवस्था
- गळके-तुटके नळांमधून पाणी गळती
- वाहनतळामध्ये जुने अस्ताव्यस्त साहित्य
- तलाव परिसरात अस्वच्छता
- पंपांमधून पाणी गळती, आधाराचे बार कमकुवत

लहान मुलांबाबत अक्षम्य बेपर्वाई...
बेबी टॅंक आणि मोठा टॅंक यामध्ये लहान मुलांसाठी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. दोन्ही तलावांमध्ये अडथळा म्हणून केवळ दोर लावण्यात आलेला आहे. त्याने, कधीही दुर्घटना घडू शकते.

फॅब्रिक छतामुळे अंधार
तलावावर सावली असावी व कचरा परिसरात येऊ नये यासाठी फॅब्रिक छत टाकण्यात आले आहे. मात्र, हे जाड छत अनावश्यक असून ढगाळ वातावरणात त्याने अंधार पडत आहे. सूर्य प्रकाशही परिसरात पडणे गरजेचे असल्याचे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.

स्मार्ट सिटीला साजेसा सुविधापूर्ण जलतरण तलाव असणे अपेक्षित होते. मात्र, येथील कामावरून नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसते. महिन्याभरातच दुरुस्तीची वेळ येते, याचा अर्थ काम गुणवत्तापूर्ण दर्जेदार झालेले नाही. बेबी टॅंक व तलावाच्या काठावर चपला, बॅगा ठेवाव्या लागतात. येथे सर्व सुविधा कराव्यात.
- शीतल शितोळे, अध्यक्षा, शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठान, सांगवी

वाहनतळामध्ये उद्‍घाटनाच्या आधीपासून जुने साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. कचरा साचलेला आहे. यामुळे परिसराला बकालपणा येत आहे.
- लिओ ज्युल्स, अध्यक्ष, आनंदनगर मित्र मंडळ

स्थापत्य विभागाला येथील दुरूस्ती व आवश्यक मागण्यांसंदर्भात कळविले आहे. प्रत्यक्ष पाहणी करून दुरूस्ती कामे करण्यात येतील.
- पंकज पाटील, क्रीडा अधिकारी, महापालिका

क्रीडा व स्थापत्य विभाग अशी संयुक्त पाहणी करून नागरिकांच्या सूचनेनुसार येथील दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
- मनोज सेठिया, सह शहरअभियंता, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com