पावसामुळे दिवेघाटाची वाट सुखद

पावसामुळे दिवेघाटाची वाट सुखद

विलास काटे : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता.२ ः खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका...टाळ मृदंगाचा निनाद...माउली नामाचा अखंड गजर...अन् दुपारनंतरच्या वाटचालीत वरुणराजाची हजेरी. या सरींमध्ये चिंब भिजत वारकऱ्यांनी हिरव्यागार निसर्गाच्या आनंद घेतला. दिवे घाटातील अवघड वळणांची वाटचाल लिलया पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हाकाठच्या सासवडमध्ये दोन दिवसांसाठी मुक्कामी थांबला. यंदा आळंदीपासूनच वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
‘पाऊले हळू हळू चाला, मुखी हरिनाम बोला,’ म्हणत काहीसी संथगतीने वाटचाल असली तरी सोहळ्यामधील वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. दरम्यान, आज सकाळी माउलींच्या पादुकांवर प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा झाली. या वेळी विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते. पुण्यातील दोन दिवसांचा पाहुणचार उरकल्यावर माउलींचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने चालू लागला. शिंदेछत्री जवळ परंपरेप्रमाणे आरती झाल्यानंतर सोहळा हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाला. रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांच्या टाळांचा गजर आणि मुखातून निघणारे अभंग पदोपदी दिंडीत चालण्याचा मोह खुणावत होता. रस्ते प्रशस्त असल्याने एका बाजूला दिंड्या आणि दुसऱ्या बाजूने भाविकांची गर्दी होती. वारकऱ्यांची वाहनांना वाट करून दिली जात होती. जागोजागी एकादशीचा फराळ आणि चहाचे वाटप होत होते. हडपसर येथील उड्डाणपुलावर सोहळ्याचे मनमोहक चित्र कॅमेऱ्यात घेण्याचा मोह होत होता. पुढे फुरसुंगी फाट्यावर उन्हाची तिरीप वाढू लागल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. हडपसर, फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकी परिसरात जागोजागी वारकऱ्यांना फराळ व पाणी दिले जात होते. दुपारी दोनच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. अंगावर प्लॅस्टिकचे घोंगटे, छत्री घेतलेल्या असंख्य वारकऱ्यांचे चित्र कॅमेऱ्यात चित्रबद्ध करत अनेक पुणेकरांनी पावसाबरोबरच भजनाचा आनंद घेतला. वडकी येथे पालखी साडेतीनला पोहोचली. वतोपर्यंत असंख्य वारकरी दिवेघाट चढू लागले होते. वडकीतील विसावा झाल्यानंतर सोहळ्यातील दिंड्या एकेक करत दिवेघाटाच्या दिशेने चालू लागल्या. मानाचे अश्व पावणेपाचला दिले घाट चढू लागले. त्यानंतर माउलींचा रथ सव्वापाचला पुढे सरकू लागला. घाटरस्ता पार करण्यासाठी रथाला जादा बैलजोडी जुंपली होती. पावसामुळे घाटातील वाटचाल सुखकर झाली. तरुणाईंची लक्षणीय होती. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घाट पार करून सोहळा झेंडेवाडीत पोहोचला आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवत ‘माउली माउली’चा गजर केला. घाटातील हिरवाई आणि वारकऱ्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह प्रत्येकाला होता. रात्री दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवड येथे पालखी विसावली.

क्षणचित्रे...
- गर्दीमुळे दिवसभर वाटचाल संथगतीने
- प्रत्येक ठिकाणी पालखीला काहीसा उशीर
- दुपारी एकपर्यंत उन्हाचा तडाखा
- दुपारी दोननंतर पाऊस
- सायंकाळी सव्वापाचला माउलींचा रथ दिवे घाट चढण्यास सुरुवात
- रथाला जादा सात बैलजोडी जुंपली
- पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन सुरळीत
- पावसामुळे सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी चिखल
.....
दिवे घाट ः संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने मंगळवारी दिवेघाट लीलया पार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com