

जुनी सांगवी, ता.१६ ः पिंपळे निलख गावठाण परिसरातून पुणे व इतर ठिकाणी जाण्यासाठी पीएमपी बस सेवा उपलब्ध आहेत. मात्र बसथांब्यावर निवारा शेडच नसल्याने ऐन पावसाळ्यात प्रवाशांना रस्त्यावर बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे मुख्य बसथांब्यासह मोक्याच्या सर्व थांब्यांवर निवारा शेड, वीज, बसण्याची व्यवस्था तत्काळ केली जावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
विशालनगर भाग वगळता पिंपळे निलख गावठाण परिसराची लोकसंख्या अंदाजे पंधरा हजारांच्या घरात आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाच्या पाण्यात भिजत बसची वाट पाहणे ही या भागातील नागरिकांची रोजचीच समस्या बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत आजारपणाची शक्यता वाढली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी यापूर्वी वारंवार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निवारा शेडची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. काही ठिकाणी जुने शेड होते, ते देखील रस्त्याच्या कामाच्यावेळी काढून टाकण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा बसविलेच गेले नाहीत. रक्षक चौक येथील बसथांब्यावरील छिद्र पडलेले सिमेंट पत्रे, रंग उडालेला बसथांबा अशी दुरवस्था झालेली आहे.
प्रवासी सुरेखा चोपडे म्हणाल्या,‘‘दररोज सकाळी पावसात भिजत बसची वाट पाहावी लागते. वेळेवर पोहोचण्यासाठी इतरत्र आडोसा घेतला; तर बस चुकण्याची भीती असते म्हणून रस्त्यावरच थांबावे लागते.’’
प्रवासी माणिक भांडे म्हणाले,‘‘सध्या सुरू असलेल्या पावसामुळे त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाकडून येथे तातडीने शेड उभारण्याची गरज आहे.’’
विद्यार्थिनी वैष्णवी पाटील म्हणाली,‘‘निवारा शेड नसल्याने सर्व प्रवाशांना पावसामध्ये बसची वाट पाहत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. बसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. डेक्कन बस सुरू करावी.’’
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून येथे उपाय योजना करण्यात येतील.
- निरंजन तुळपुळे, मुख्य अभियंता (स्थापत्य) पीएमपीएल
PIM25B19929
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.