वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह रक्षक चौकात भेदणे अवघड वाहनचालकांना दररोज सहन करावा लागतोय प्रचंड त्रास
रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. ३ ः सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येत आहे. भुयारी मार्ग खोदकाम व उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रक्षक चौकात रस्ता अरुंद झाल्याने परिणामी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सांगवी आणि औंधला जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत-किवळे बीआरटी मार्ग सुरू होतो. बाणेर, बालेवाडी भागांत ये-जा करण्यासाठी बहुतांश आयटीयन्सही पिंपळे निलख रक्षक सोसायटी संरक्षण हद्दीतून पिंपळे निलख गावठाण परिसरातील रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर सकाळी कार्यालयीन कामकाजावेळी व सायंकाळी कार्यालये सुटल्यावर पिंपरी चिंचवडमधून पुण्यात जाणारे व पुण्यातून येणारे कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात याच रस्त्यांवरून वाहतूक करत असल्याने रक्षक चौकात सकाळी व विशेषतः सायंकाळी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अक्षरश: नागरिक पाऊण ते एक तास या चौकात अडकून पडत आहेत.
सांगवी फाटा ते रावेत-किवळे बीआरटी मार्ग या रस्त्याचे दहा वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरण करून बीआरटी मार्गिका, मुख्य मार्ग व सेवा रस्ता निर्माण केला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांतच पदपथांसह सायकल मार्ग उभारून कडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरणही केले. सध्या रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याने जगताप डेअरी चौक, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरी, पुणे व महामार्गावर जाता येईल. याशिवाय पिंपळे निलख रक्षक सोसायटी संरक्षण हद्दीतून पिंपळे निलख गावठाण परिसरातून स्वतंत्र भुयारी मार्गाचेही काम सुरू आहे. त्यानेही बाणेर, बालेवाडी भागांत ये-जा करण्यासाठी रहदारी सुकर होण्यास मदत होणार आहे. बहुतांश आयटीयन्सही याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते.
कोंडीची प्रमुख कारणे...
- सांगवी-रावेत मुख्य रस्त्यावरील उड्डाणपूल व भुयारी मार्गामुळे अरुंद झालेला रस्ता
- पिंपळे निलख गावठाण भागातून येणारी वाहतूक व औंधकडून येणारी वाहतूक चौकात एकत्र येणे
- पिंपळे निलख भागातून येणारी जड वाहने, पिंपळे निलख, सांगवी फाटा भागाकडून वळसा घालून औंध, सांगवी जिल्हा रुग्णालयाकडे जाणारी वाहने
- पिंपळे निलखकडून चौकात येणाऱ्या वाहनांसाठी चौक कोपरा पडतोय अपुरा
- सांगवी जिल्हा रुग्णाकडे जाणारा भुयारी मार्गात चिखल, दुचाकी घसरून अपघात
असा आहे रक्षक चौक
सांगवी-रावेत बीआरटी मार्गावर रक्षक चौक आहे. संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या रक्षक सोसायटी चौकातून पिंपळे निलखकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूस चौक लागतो. उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर रक्षक चौकातून पिंपळे निलख गावठाण मार्गे बाणेरला जाण्यासाठी सोयीचा रस्ता आहे.
सध्या एकेरी वाहतुकीमुळे ताण
पिंपळे निलख रस्त्यावर सध्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक चालू आहे. रक्षक चौक ते गावठाणात संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने सध्या पर्यायी रस्त्यावर होणारी वाहतूक, जड वाहनांची मोठी संख्या वाढून याचा मुख्य रक्षक चौकावर ताण येत आहे.
या हव्यात उपाययोजना -
- जड वाहनांना या मार्गावर प्रतिबंध करून रात्री उशिरा वाहतुकीला परवानगी द्यावी
- रक्षक चौकाच्या दोन्ही रस्त्यांवर वाहतूक पोलिस व वाहतूक वॉर्डनची कायमस्वरूपी नेमणूक करावी
- पिंपळे निलख बाजूच्या रस्त्याचे रुंदीकरण करून ये-जा करण्यासाठी लेन वाढवाव्यात
- रक्षक चौकातील पिंपळे निलखकडून येणाऱ्या कोपऱ्याचे रुंदीकरण करावे
‘पिंपळे निलखकडून येणारी जड वाहने, सांगवी-औंधकडे मोठा वळसा युटर्न घेणारी वाहने तसेच बेशिस्त वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे.’
- विजय भोसले, वाहन चालक
‘वाहतूक संचलनासाठी वॉर्डन व वाहतूक पोलिस नियमित असतात. पिंपळ निलखकडून डाव्या बाजूला येणाऱ्या वाहनांसाठी चौकातील अपुरा पडणारा कोपरा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर जड वाहनांना प्रतिबंधित करून पिंपळे निलखसाठी स्वतंत्र एक मार्गिका करून कोंडीतून मार्ग काढण्यात येईल. काम सुरू असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे.’
- प्रमोद ओंभासे, मुख्य शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
वाहतूक संचलनासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस व वॉर्डनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शाळा, कार्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला जड वाहनांना बाजूला करून चौकातील रहदारी सुरळीत करण्यात येते.’
- प्रदीप पाटील, पोलिस निरिक्षक, सांगवी वाहतूक विभाग
फोटोः 20039
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.