जुनी सांगवीतील कुंभारवाड्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू
जुनी सांगवी, ता.१० ः जुनी सांगवीतील कुंभारवाडा परिसरात सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती स्टॉल उभारणीसह भाविकांची गणेश मूर्तींच्या बुकिंगसाठी वर्दळ वाढली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे पारंपरिक व आधुनिक अशा विविध स्वरूपातील गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गेल्या काही महिनाभरापासून कारागिरांनी गणेशमूर्ती घडविण्याचे काम जोमात सुरू केले आहे. आता मूर्तींवर बारकाईने रंगकाम करण्याचा आणि आकर्षक सजावट देण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. प्रत्येक मूर्ती खास कलात्मक व्हावी यासाठी कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. यावर्षी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी असून लहान आकाराच्या घरगुती मूर्तींपासून ते मोठ्या मंडळाच्या मूर्तींपर्यंत सर्व प्रकार उपलब्ध आहेत. खरेदीसाठीची भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून कुंभारवाड्यात गल्ल्या रंगांनी, मूर्तींच्या सौंदर्याने आणि भक्तीच्या वातावरणाने उजळल्या आहेत.
गणपती मंडळे आणि भाविकांच्या ऑर्डरनुसार मूर्तींवर वेगवेगळ्या प्रकारची रंगसंगती आणि अलंकरण केले जात आहे. याखेरीज परिसरात गणपती उत्सवासाठी स्टॉल उभारणीची लगबगही सुरू आहे. मंडप सजावट साहित्य, विद्युत रोषणाई, फुलांची आरास, पूजाविधी साहित्य आणि इतर सणोपयोगी वस्तू विक्रीसाठी दुकानांमध्ये मांडल्या जात आहेत.
PIM25B20228