खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका
जुनी सांगवी, ता.१६ ः रक्षक चौक येथील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनचालकांची खड्ड्यांपासून सुटका झाली आहे. मात्र, सकाळी व रात्री संथगतीने होणारी वाहतूक व कोंडी आता नित्याची झाल्याने त्याचा वाहनचालकांनी धसका घेतला आहे.
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ येथील रक्षक चौकात दुतर्फा बाजूस वाहतूक ठप्प होत असून हे चित्र आता कायमचे दिसू लागले आहे. येथील चौकात औंधच्या दिशेने रावेतकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग व उड्डाणपूल रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून चोंधे पाटील भुयारी मार्ग व मागे सांगवी फाटा उड्डाणपूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पिंपळे निलख येथून येणारी वाहने देखील मुख्य चौकात आल्यावर कोंडी होत आहे.
बेशिस्त चालकांची भर
सांगवी फाटा येथून दुचाकी चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चक्क सायकल ट्रॅक, पदपथावरून वाहने चालविताना दिसून येतात. यावेळी दुचाकी वाहने रक्षक चौकात येताच मुख्य रस्त्यावरून बेशिस्तपणे पुढे सरसावत असल्याने जड वाहने, चारचाकी वाहनांच्या कोंडीत भर पडत आहे.
पोलिसांची कसरत
रक्षक चौकातील होणारी कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस व वॉर्डनची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे असले तरी वाहतूक संचलनासाठी सकाळी व रात्री पोलिसांनाही कसरत करावी लागते.
विकास कामे करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यायला हवी. विकासकामे व्हावीत. मात्र, त्या आधी रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असते.
- अनिकेत लांघे, वाहन चालक
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. त्यामुळे डांबरीकरण करून रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून रहदारी सुरळीत करण्याचा नियमित प्रयत्न सुरू आहेत. काम गतीने सुरू आहे.
- दामोदर तापकीर (उपअभियंता) प्रकल्प, महापालिका
सध्या या चौकात भुयारी मार्गाचे काम गतीने सुरू आहे. यावर्षा अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), महापालिका
प्रकल्पाचे फायदे
- भुयारी मार्गाने पुणे, पिंपरी चिंचवड शहरे आणखी जवळ येणार
- चौक सिग्नल फ्री होणार, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
- पिंपळे निलखकडे व पिंपळे निलखकडून पिंपळे सौदागरकडे तसेच जगताप डेअरी चौकातून सांगवी फाटा तसेच सांगवी फाटा ते जगताप डेअरीकडे विनाअडथळा वाहतूक होणार
- पादचारी व पीएमपी प्रवाशांची सुरक्षित वाहतुकीस चालना
- मुक्त रहदारीने वेळ आणि इंधनाची बचत
भुयारी मार्गाची माहिती
- एकूण लांबी : ३६३ मीटर
- औंध बाजूकडील रॅम्पची लांबी : १२५ मीटर
- बॉक्सची लांबी : १८ मीटर
- जगताप डेअरी चौक बाजूकडील रॅम्पची लांबी : २२० मीटर
- भुयारी मार्गाची रुंदी : २६.४ मीटर
- बॉक्सची उंची : ५.५ मीटर
- कामाची मुदत : १८ महिने
PIM25B20370