चौक रुंद, रस्ते प्रशस्त; मात्र पार्किंग पूर्ण बेशिस्त !
जुनी सांगवी, ता.१८ ः सांगवी परिसरातील प्रमुख चौक व रस्ते महापालिकेने प्रशस्त आणि रुंद केले. मात्र, बेकायदा आणि बेशिस्त पार्किंगमुळे ते अपुरे पडू लागले आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक वाहने, नोकरदार वर्गाला रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून दंडात्मक कारवाई केली जाते. पण, ती केवळ दिखाव्यापुरती असल्याने सांगवीकरांत नाराजी आहे.
जुनी सांगवी परिसरातील रहदारी वाढली असून त्यासोबतच बेशिस्त वाहन पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. प्रमुख रहदारीचे रस्ते रुंद असूनही दुहेरी पार्किंगमुळे ते अरूंद होऊन रहदारीसाठी अपुरे पडत आहेत. जुनी सांगवी व नवी सांगवीला जोडणारा संविधान चौक, माहेश्वरी चौक रस्त्याच्या दुतर्फा जड वाहने उभी केली जातात. समोरच कामगार नाका असल्याने मजूर, कारागिरांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. चौकातून पिंपळे गुरव व सांगवीला जाणारा रस्ता हा परिसरातील महत्वाचा दळणवळण मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला पार्किंग केल्याने मुख्य रस्ता अरुंद होतो. संविधान चौकातून दापोडीकडे जाणारी वाहतूकही अशाच बेशिस्त पार्किंगमुळे खोळंबत आहे.
बेशिस्त पार्किंगच्या जागा
- संविधान चौक ते माहेश्वरी चौक
- माहेश्वरी चौक ते साई चौक
- संविधान चौक ते पीडब्ल्यूडी रस्ता
- प्रियदर्शनीनगर - ममतानगर रस्ता
- मुळा नदी किनारा रस्ता, शिवांजली कॉर्नर आदी
बाहेरील नागरिकांकडूनही वापर
महापालिकेने रस्ते मोठे केले. चौक रुंद केले. पण, त्याचा फायदा बेशिस्त वाहनचालकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी झाला आहे. नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केल्याशिवाय परिस्थिती सुधारू शकत नाही. छोटे दुकानदार, व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. जुनी सांगवीत न राहणारे वाहनचालक देखील येथील रस्त्यांवर वाहने उभी करून निघून जात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. ममतानगर रस्ता व संविधान चौक, माहेश्वरी चौक ते साई चौक या दरम्यानच्या परिसरात वाहनांची संख्या मोठी आहे.
अपुऱ्या उपाय योजना
महापालिका व वाहतूक पोलिसांकडे रहिवाशांनी वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. अधूनमधून दंडात्मक कारवाई केली जाते. पण, ती केवळ दिखाव्यापुरती असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. कायमस्वरूपी उपाय योजना झालेली नसल्याने समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
नागरिकांच्या मागण्या
- चौक व रस्त्यांवर शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था हवी
- दुहेरी, तिहेरी पार्किंगवर तातडीने दंडात्मक कारवाई व्हावी
- गर्दीच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवावी
रस्ते मोठे असूनही केवळ दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे रस्ते रहदारीसाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे रस्ते रहदारीसाठी की पार्किंगसाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- रुपेरी पुजारी, नागरिक
संविधान चौकात कामगार नाका असल्याने सकाळी व रात्री येथे मजूर, कारागिरांची मोठी गर्दी असते. यातच अवजड वाहने, इतर चारचाकी वाहनांमुळे येथे कोंडी होते.
- धम्मरत्न गायकवाड, नागरिक
सांगवी परिसरातील पार्किंग समस्येवर नियमित कारवाई सुरू असून रहदारीसाठी अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. आमचे या परिसरात लक्ष असून महापालिका, व्यापारी नागरिकांसोबत चर्चा करून येथील पार्किंग बाबत तोडगा काढला जाईल.
- प्रदीप पाटील, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक, सांगवी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.