कचरा फेकणाऱ्यांवर आता कर्मचाऱ्यांचे लक्ष
जुनी सांगवी, ता.१ ः जुनी सांगवीतील अनेक भागांत रस्त्याच्याकडेला टाकला जाणारा कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांद्वारे नियमित गस्त घालून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच परिसरात जागरूकता आणि प्रबोधन मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे.
जुनी सांगवी परिसरातील सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याने दुर्गंधी पसरत असून डास व माशांचा उपद्रव वाढत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण होत आहे. याबाबत ‘सकाळ’मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारी व वाढत्या अस्वच्छतेची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने वरील विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी नियमित गस्त घालून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवतील. यासोबतच नागरिकांना घरगुती कचऱ्याचे ओला-सुक्या प्रकारात वेगळे संकलन करण्याचे आवाहन केले जात आहे. शाळा, बाजारपेठ, वसाहती येथे विशेष प्रबोधन करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. याद्वारे बहुतांश ठिकाणी पडणारा कचरा रोखण्यात यश आले असले तरी त्यामध्ये सातत्य हवे, असे सजग नागरिकांनी सांगितले.
अपुऱ्या उपाययोजना
जुनी सांगवी प्रभागात कचरा संकलन वाहने जुनी व नादुरुस्त असल्याने त्याचा कचरा संकलनावर परिणाम होत आहे. परिणामी, साचलेला कचरा नागरिक रस्त्यावर भिरकवतात. कचरा संकलन वाहनांची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून केलेले उपक्रम समाधानकारक आहेत. पण, त्यात सातत्य हवे.
- विकास भागवत, रहिवासी, शिंदेनगर
सायंकाळी व रात्री मुळा नदी किनारा परिसरात रस्त्यालगत पडणारा कचरा रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कर्मचारी उभे करण्यात आले आहेत. याचबरोबर रहिवासी भागात कचरा संकलन वाहनांतच द्यावा, याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
- संदीप राठोड, आरोग्य निरीक्षक, जुनी सांगवी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.