‘फोक प्रबोधन’च्या माध्यमातून मराठी भाषेला अभिवादन
पिंपरी, ता. ५ : मराठी भाषेचे माधुर्य, लोकसंगीताची लय आणि मातीच्या गंधात रुजलेली लोकपरंपरा... या तिन्हींचा सुरेल संगम पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झालेल्या ‘फोक प्रबोधन’ कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवला. लोककलांच्या सजीव स्वरांनी, नृत्यांच्या तालांनी आणि मराठी अस्मितेच्या ओलाव्याने भरलेला हा सोहळा केवळ कलात्मक मेजवानी नव्हे, तर मराठी संस्कृतीच्या शतकांपूर्वीच्या लोकसंस्कृतीच्या ठेवा नवपिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला. मराठी संस्कृतीतील शब्द, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम अनुभवताना रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ‘फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘पिंगळा महाद्वारी’ व ‘आला वासुदेव तुमच्या दारी’ यांच्या सादरीकरणातून झाली.
लोककलांचा प्रवासात ‘गोंधळ’ व ‘गण’ सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘जोगवा’ या लोककलेने प्रेक्षकांना भारावून टाकले. शाहिरी परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘चमके शिवबाची तलवार’ या गजरात उजळून निघाला. त्यानंतर बासरी वादन, वारकरी भजन आणि ‘ज्ञानेश्वर माउली, जय जय विठ्ठल’ च्या गजरात रंगमंचावर कलाकारांनी दिंडी सोहळा साकारला. दिव्यांग कलाकार ऋषी मोरे यांनी ‘भल्या माणसा...’ हे गीत सादर केले. ‘आल्या पाच गवळणी’ या भारुडाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर धनगरी नृत्याच्या तालावर प्रेक्षक थिरकले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या गाण्याच्या सादरीकरणाने कलाकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कलाजीवनाचा आलेख मांडणारी लावणी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. भैरवीने कार्यक्रमाचा शेवट झाला. या कार्यक्रमातून मराठी लोककला, लोकसंस्कृती आणि लोकभावना यांचा रंगतदार मेळ घडला.
---