रक्षक चौकात 
कोंडीचा कहर

रक्षक चौकात कोंडीचा कहर

Published on

जुनी सांगवी, ता. ६ : रक्षक चौक मुख्य रस्त्यावरील भुयारी सबवे, उड्डाणपुलाचे संथगतीने सुरू असलेले खोदकाम, अरुंद झालेला रस्ता, चौकात एकत्र येणारी वाहने, पिंपळे निलख रस्ता यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. प्रामुख्याने सकाळी व रात्री येथील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिक हैराण झाले आहेत. या कोंडीमुळे काही मिनिटांच्या प्रवासाला तासाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विकासकामे करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची आधी काळजी घ्यावी, असा संतप्त सूर नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून येथील चौकात दुतर्फा वाहतूक ठप्प होत आहे. हे चित्र आता नित्याचेच होत चालले आहे. येथील चौकात औंधहून रावेतकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग व उड्डाणपूल रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने परिणामी चोंधे पाटील सबवे भुयारी मार्ग व मागे सांगवी फाटा उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. चौकात पिंपळे निलख येथून येणारी वाहने देखील मुख्य चौकात आल्यावर कोंडी होते.

बेशिस्त वाहनचालकांची कोंडीत भर
सांगवी फाटा येथून दुचाकी चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चक्क सायकल ट्रॅक, पदपथावरून वाहने चालविताना दिसून येतात. ही दुचाकी वाहने रक्षक चौकात येताच आडवीतिडवी वाहने मुख्य रस्त्यावरून पुढे सरसावत असल्याने जड वाहने, चारचाकी वाहनांच्या कोंडीत भर पडते.

प्रकल्पामुळे भविष्यात होणारे फायदे
- रक्षक चौक सिग्नल फ्री होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
- चौकातून पिंपळे निलखकडे व पिंपळे निलखकडून पिंपळे सौदागरकडे तसेच जगताप डेअरी चौकातून सांगवी फाटा तसेच सांगवी फाटा ते जगताप डेअरीकडे विनाअडथळा वाहतूक होण्यास मदत होणार
- पादचारी व पीएमपीएमएल प्रवासी यांची सुरक्षित वाहतूक होणार
- मुक्त रहदारी होणार असल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार
- प्रदूषण कमी होण्यास मदत होणार
- रस्ता पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने हा सबवे ठरणार फायदेशीर
- एकूण प्रवासाचा कालावधी कमी होणार

असा आहे प्रकल्प
- एकूण लांबी : ३६३ मीटर
- औंध बाजूकडील रॅम्पची लांबी : १२५ मीटर
- बॉक्सची लांबी : १८ मीटर
- जगताप डेअरी चौक बाजूकडील रॅम्पची लांबी : २२० मीटर
- सबवेची रुंदी : २६.४ मीटर
- बॉक्सची उंची : ५.५ मीटर
- कामाची मुदत : १८ महिने

विकासकामे जरूर करावीत. मात्र, ती करत असताना रहदारीस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र, तशी काळजी रक्षक चौकात घेतली गेलेली नाही.
- अरुण शिंदे, स्थानिक रहिवासी

सांगवीकरांना आता रक्षक चौकात यू टर्न घेण्यासाठी थेट चौंधे पाटील सबवे पुढे जावे लागते. हे काम गतीने होणे अपेक्षित होते. मात्र, काम संथगतीने सुरू आहे.
- गणेश बोंबले, रहिवासी, पिंपळे निलख

महापालिका व पोलिस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. काम गतीने सुरू आहे.

- दामोदर तापकीर, उपअभियंता, प्रकल्प, पिंपरी चिंचवड महापालिका

सध्या या चौकात भुयारी मार्गाचे काम गतीने सुरू आहे. वर्षअखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

रक्षक चौक, पिंपळे निलख : संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज सकाळी व रात्री होणारी वाहतूक कोंडी.

रक्षक चौक ः उड्डाणपूल सबवेचे सुरू असलेले काम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com