फुलांच्या सुगंधात बहरला संसार
अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ ः भारतीय संस्कृतीत कमळ, गुलाब, झेंडू आणि जास्वंदासारख्या फुलांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, जी आध्यात्मिक जागृती, पवित्रता आणि उत्सवांचे प्रतीक मानली जातात. जी आनंद, प्रेम, दुःख, कृतज्ञता आणि सांत्वन यासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी एक माध्यम म्हणून वापरली जातात. पण काहींसाठी ही नाजूक फुले केवळ प्रतिके नसतात. तर ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात, त्यात संकल्प आणि आशेच्या रंगांची उधळण करतात. अशीच आहे एका साध्या फूल विक्रेत्या बाबुराव चौधरी यांची कहाणी. ज्यांचे आयुष्य त्यांच्या विक्रीच्या हारांप्रमाणेच बहरले आहे.
पुरंदर तालुक्यातील परिंचे गावातून आलेले बाबुराव यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शाळा संपल्यानंतर १९९७ मध्ये त्यांचे चुलते त्यांना पुण्यातील कॅम्प परिसरात कौटुंबिक फूल व्यवसायात मदतीसाठी घेऊन आले. १९९७ ते २००३ या सहा वर्षांत बाबुराव यांनी फुलांचे हार गुंफणे, वेण्या बनवणे आणि ग्राहकांना फुले विकणे यासारखी कामे केली. येथेच त्यांनी फुलांची कला शिकली, पण वैयक्तिक कारणांमुळे त्यांना हा व्यवसाय सोडावा लागला.
‘आता पुढे कुठे जायचे’ असा प्रश्न बाबुराव यांना पडला, अनिश्चिततेत ते बुडाले. पण नियतीने त्यांना साथ दिली. फुलांच्या दुकानात ओळख झालेल्या विनायक सोनायेल्लू यांनी त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात येण्याचा सल्ला दिला. या शहरात ना कोणी ओळखीचे, ना राहायला जागा. अशा वेळी सांगवीतील श्री दत्त आश्रमाने त्यांना आश्रय दिला. आश्रमातच राहून त्यांनी तिथेच फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
छोट्या स्टॉलपासून सुरुवात केली, तासनतास उन्हात बसणे, अनिश्चित विक्री आणि शहराच्या धकाधकीचे जीवन. तरीही, फुलांबद्दलची त्यांची आवड त्यांच्या चिकाटीचे बळ ठरली. ‘फुलांनी मला संयम शिकवला,’ बाबुराव हसतमुखाने सांगतात. ‘ती आपल्या वेळेनुसार बहरतात, आणि माझे आयुष्यही तसेच बहरले.’
आज, २२ वर्षांनंतर, त्यांचा तो छोटासा स्टॉल एका बहरलेल्या वटवृक्षासारखा विस्तारला आहे. त्यांच्या पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांनी हा व्यवसाय कौटुंबिक बनवला आहे. विशेष म्हणजे, आणखी तीन कुटुंबेही या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. फुलांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. फुले केवळ मंदिरे किंवा लग्नसोहळे सजवत नाहीत; तर ती आयुष्यही घडवतात. हवेत फुलांचा सुगंध दरवळत असताना बाबुराव यांचा प्रवास काँक्रीटच्या जंगलात एक प्रेरणादायी फूल बनून उभा आहे.