शिवसृष्टी उद्यानात मुलांशी धोकादायक ‘खेळ’
जुनी सांगवी, ता.१२ ः जुनी सांगवी येथील स्व. तानाजीराव शितोळे सरकार शिवसृष्टी उद्यानात लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली अनेक खेळणी तुटलेली असून ती मुलांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत. अनेक पालकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप दुरुस्ती किंवा बदलाचे काम झालेले नाही. नादुरुस्त खेळणी बदलून त्याठिकाणी नवीन खेळणी बसविण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
जुनी सांगवी जयमाला लक्ष्मीनगर येथे असलेल्या शिवसृष्टी उद्यानात इतर उद्यानांपेक्षा नागरिकांची सहकुटुंब मोठी गर्दी असते. येथील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना अपघात व धोका होऊ नये यासाठी बांधून ठेवली आहेत. परंतु, त्याने लहान मुलांचा हिरमोड होत आहे. दोन वर्षांपूर्वी येथे तुटलेल्या घसरगुंडीवर खेळताना एका चिमुकल्याची करंगळी अडकून अपघात झाला होता. काही दिवसांत लहान मुलांना दिवाळी सुट्ट्या लागतील. हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उद्यानाकडे लक्ष द्यावे. काही झोपाळे व घसरगुंड्या गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्याने लहान मुले जखमी होण्याचा धोका आहे.
उद्यानात खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. जुनी खेळणी बदलून त्या जागी नवीन खेळणी तत्काळ बसविण्यात यावीत.
- भानुदास भोरे, नागरिक
प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे तातडीने लक्ष देऊन मुलांच्या खेळण्यांची व्यवस्था करावी. सुटीच्या काळात मुलांची उद्यानात मोठी गर्दी असते. तुटलेल्या घसगुंड्या व झोक्यामुळे अपघाताचा धोका आहे.
- विलास हिंगे, नागरिक
उद्यानात नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. नवीन साहित्य बसविण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत आवश्यक दुरुस्ती कामे केली जातील. तसेच नवीन खेळणी बसविण्यात येतील.
- महेश गारगोटे, मुख्य उद्यान निरीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका