उद्यानातील तुटकी खेळणी; मुलांचा हिरमोड

उद्यानातील तुटकी खेळणी; मुलांचा हिरमोड

Published on

जुनी सांगवी, ता. २५ : येथील जयमालानगर-लक्ष्मीनगर परिसरातील स्व. तानाजीराव शितोळे सरकार शिवसृष्टी उद्यान आणि मधुबन येथील शिवछत्रपती उद्यानातील नादुरुस्त खेळण्यांमुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. तुटक्या खेळण्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून, गेल्या काही महिन्यांपासून नव्या खेळण्यांची मागणी करण्यात येत असतानाही त्याकडे दिरंगाई होत असल्याने मुलांकडून ‘आम्ही काय खेळायचे?’ असा सूर ऐकायला येत आहे. क्रीडा उद्यान विभागाकडून या प्रश्नाकडे सातत्याने कानाडोळा करून दिरंगाई होत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, शिवसृष्टी उद्यान आणि शिवछत्रपती उद्यानातील झोपाळे, स्लाइड्स, सी-सॉ, क्लाइंबर्स यांसारखी खेळणी तुटकी, गंजलेली किंवा पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहेत. झोके तुटल्याने ते बांधून ठेवण्यात आले असून, काही खेळणी अपघात टाळण्यासाठी पूर्णपणे वापर बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे रोज संध्याकाळी खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांचा हिरमोड होत आहे.
उद्यानातील गंज, तुटलेले भाग आणि सैल झालेले बोल्ट याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मुलांच्या सुरक्षेशी थट्टा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गतवर्षी शिवसृष्टी उद्यानात तुटलेल्या फायबर स्लाइडमध्ये एका चिमुकल्याची करंगळी अडकून तुटल्याची दुर्घटना घडली होती. उत्साहाने उद्यानात धावून येणाऱ्या मुलांना तुटकी, गंजलेली आणि वापरण्यायोग्य नसलेली खेळणी पाहून परत जावे लागत आहे. त्यामुळे नवीन व सुरक्षित खेळण्यांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

देखभाल शून्य, प्रशासनाचा उदासीनपणा
- पालिकेकडून उद्यानांच्या दुरुस्ती व देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष
- अनेक महिन्यांपासून तक्रारी असूनही ठोस कारवाईचा अभाव
- मुलांसाठी सुरक्षित खेळणी उपलब्ध करणे ही मूलभूत सुविधा असूनही सातत्याने दुर्लक्षित

नागरिकांच्या मागण्या
- नादुरुस्त खेळणी तातडीने हटवावीत.
- नवीन, सुरक्षित व दर्जेदार खेळणी बसवावीत.
- उद्यानांची नियमित देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
- सुरक्षा मानकांनुसार खेळण्यांची पंधरवड्याला एकदा तपासणी करावी.

‘‘गेल्या काही महिन्यांपासून येथील खेळणी विना वापराविना लटकवून ठेवली आहेत. त्यामुळे मुलांना इतर खेळांचे पर्याय शोधावे लागतात. यामुळे मुलांचा हिरमोड होत आहे.
- विकास लोले, नागरिक

‘‘उद्यान विभागाकडून उद्यान देखभाल दुरुस्ती निविदा प्रक्रिया सुरू आहे. यानंतर सर्व ठिकाणी पाहणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
- महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com