सांगवी, दापोडीत दत्त जयंती भक्तिमय वातावरणात साजरी
जुनी सांगवी, ता. ४ ः जुनी सांगवी येथील प. पू. बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित दत्त आश्रमात दत्त नाम सप्ताह व दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पहाटेपासूनच आश्रम परिसर दत्त जयजयकार, हरिनाम संकीर्तन आणि मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला होता. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सकाळ-सायंकाळ विशेष पारायण, गुरुचरित्र पठण, अभिषेक, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन पार पडले. शेवटच्या दिवशी दत्त जयंतीनिमित्त विशेष महापूजा, पंचामृत अभिषेक आणि धूप-दीप आरतीने आश्रमात पवित्र आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. सकाळी श्री दत्त गुरूंच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध शहनाई वादक महादेव तुपे व सहकाऱ्यांनी शहनाई वादन केले. तसेच प्रसिद्ध चौघडा वादक जयवंतराव नगरकर यांचे चौघडा वादन झाले. दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन जोग महाराज आळंदी, माधव महाराज इंगोले, योगी निरंजन यांनी केले.
महिला व युवक भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तीमय गजराने भाविक मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण आश्रम फुलांच्या आरास, आकर्षक प्रकाशयोजना आणि दत्त मूर्तीच्या दर्शनाने उजळून निघाला होता. कार्यक्रमानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासूनच दत्त आश्रमात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दापोडी, फुगेवाडी
दत्तजयंती निमित्त सगळ्यांचा राजा मित्र मंडळ सी.एम ई. गेट येथे होमहवन आश्लेषा अनिल मुलगीर व संध्या अमित थेटे या दोन दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले.
कविता कणसे, सविता सातव, रूपाली लांडे ,माधवी बाईत, वर्षा शिंदे, आकांक्षा शिंदे या महिलांनी पाळणा गायन केले यावेळी दुर्गा महिला बचत गट व वर्षा विजय शिंदे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट, दापोडी यांच्या वतीने सकाळी सनई चौघडा, श्रींचा अभिषेक आणि महाआरती वंदना विकास मते याच्या हस्ते करण्यात आली. दर्शन व महाप्रसादासाठी भाविकांनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठात गर्दी केली होती. ट्रस्टच्या दीपाली कणसे, संजय कणसे यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. श्री दत्त दिगंबर प्रतिष्ठान, मुंबई कॉलनी यांच्या वतीने दत्त जयंती निमित्त सनई चौघडा, होम हवन, महाआरती, महिलांचे भजन व पाळणा आयोजन करण्यात आले. दापोडी बसस्थानक येथे दत्त जयंती निमित्त होमहवन, महाआरती, सोनू पानसरे यांच्या हस्ते करण्यात आली.

