अरुंद रस्ते, अपुरे पाणी अन् अनधिकृत बांधकामे

अरुंद रस्ते, अपुरे पाणी अन् अनधिकृत बांधकामे

Published on

पिंपरी, ता. १५ : चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद रस्ता, त्यामुळे सततची वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा समस्यांमुळे प्रभाग क्रमांक सहामधील रहिवासी त्रस्त आहेत. पण, कोंडमारा सहन करत ते आपल्या समस्या मांडायला घाबरतात. आमचे नाव-फोटो तर येणार नाही ना, अशीच भीती त्यांना वाटते. तर, स्थानिक नेते, प्रशासन या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष करत आले आहेत.
महापालिकेचा प्रभाग सहा हा झोपडपट्टी आणि उच्चभ्रू सोसायट्यांचा परिसर आहे. अतिशय दाट लोकवस्तीचा प्रभाग असून, येथे बाहेरुन आलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे. या परिसरातील सुमारे ८० टक्के क्षेत्र हे रहिवासी स्वरुपाचे आहे. तर, उर्वरित क्षेत्र हे लघुउद्योग आणि व्यावसायिकांचे आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात काम करणारे बहुतांश कर्मचारी चक्रपाणी वसाहत आणि सद्गुरूनगर परिसर राहतात. प्रभागात पाणी, वीज आणि कचरा समस्या अजूनही भेडसावत आहेत. काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झालेले नाही. चिंचोळे रस्ते, त्यात रस्त्याकडेला किरकोळ वस्तूंचे विक्रेते बसत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. प्रभागातील नागरिक प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. येथील स्थिती पाहता, या प्रभागाचा विकास अजूनही झाला नसल्याचे दिसून येते.

चतुःसीमा
उत्तरेकडील सीमा : अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते १०० बेड रुग्णालयाचा उजवीकडील भाग.
दक्षिणेकडील सीमा : पीएपीएमएलच्या सद्गुरूनगर डेपोपासून ते स्वामी समर्थ विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडील भाग. पश्‍चिमेकडील सीमा : गुळवेवस्ती रस्ता. पूर्वेकडील सीमा : चक्रपाणी वसाहत ते अक्षयनगरकडे जाणारा रस्ता.

समाविष्ट भाग
धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सद्गुरूनगर


प्रमुख समस्या
अपुरा पाणीपुरवठा : प्रभागातील सर्वच परिसरांत दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दररोज सकाळी दोन ते तीन तास पाणीपुरवठा होत असला, तरी बऱ्याच वेळा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
ड्रेनेज (मलनि:स्सारण) : परिसरातील अनेक भागांत ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांना तळ्याचे स्वरुप येते. याचा त्रास स्थानिकांसह वाहनचालकांना होतो.
अनधिकृत बांधकामे : चक्रपाणी वसाहत आणि सदगुरूनगर ‘रेड झोन’ आहे. तरीदेखील येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी- विक्रीची व्यवहार होत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.
पदपथावर अतिक्रमण : पुणे-नाशिक महामार्गावर उड्डाणपुलाखाली अनधिकृत विक्रेत्यांनी पदपथ ताब्यात घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेदेखील कठीण होत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई होत नसल्याने या विक्रेत्यांवर राजकीय वरदहस्त असल्याचे नागरिक सांगतात.
वाहतूक कोंडी : बेशिस्त रिक्षाचालक आणि पीएमपी बस थांब्यांमुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. भोसरी चौकातील पीएमपी बस थांबे मोकळ्या मैदानात नेण्याची मागणी सातत्याने होत आहे.
कचऱ्याची समस्या : अनेक ठिकाणी कचऱ्याची गाडी येत नसल्याचे काही स्थानिक रहिवासी मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे.
वांरवार वीजपुरवठा खंडित : या परिसरातील बहुतांश भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
------
कुठे? काय?
- भगतवस्ती येथे छोटे-छोटे वर्कशॉप आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लघुउद्योजक आहेत. पण, अरुंद रस्त्यांमुळे परिसरात वाहन घेऊन जाणे अवघड होते
- चक्रपाणी वसाहत आणि सद्गुरुनगर परिसर ‘रेड झोन’ असल्यामुळे पालिकेला प्राथमिक सुविधा देताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे नागरिकांची पावलोपावली गैरसोय
- नाशिक महामार्गावरून चक्रपाणी वसाहतीकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी खड्डे
- रोशल गार्डनमागे रस्त्यांचे काम रखडलेले
- भगत वस्तीकडून पांडवनगरकडे जाताना पुणे-नाशिक महामार्गावर जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडवा लागतो


असे आहेत मतदार
पुरुष : २३,५७५
महिला : १७,६७१
इतर : २
एकूण मतदार : ४१,२४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com