दापोडीत भाजप-रिपाइंची कोपरा सभा

दापोडीत भाजप-रिपाइंची कोपरा सभा

Published on

जुनी सांगवी, ता. १३ : दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील भाजप-रिपाइं उमेदवारांना विकासासाठी निवडून द्या, असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दापोडी येथे सोमवारी (ता. १२) सायंकाळी केले.
प्रभाग क्रमांक ३० भाजप-आरपीआय (आठवले) युतीचे उमेदवार संजय ऊर्फ नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर यांच्या प्रचारार्थ अरफात शेख यांची कोपरा सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शेख यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू ‘विकास’ हाच होता. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांचा उल्लेख करत त्यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर कृतीतून बदल घडवणारे प्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांशी थेट संवाद साधताना त्यांनी लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी युती कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला.
“मी महाराष्ट्राचा असून मराठी असल्याचा मला अभिमान आहे,” असे सांगत शेख यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे दर्शन घडवले. धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्वांनी विकासाच्या प्रवाहात यावे. सर्वधर्मीय मतदारांनी विकासाच्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन करत विकासाचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दरम्यान, मंगळवारी (ता.१३) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी युतीच्या उमेदवारांनी कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. सिकंदर सूर्यवंशी, विशाल वाळुंजकर, सीना बागवान, सय्यद बागवान, आसमा शेख, परविन खान, फातिमा शेख, रिजवान फरान शेख, लक्ष्मीकांत बाराथे, ताजुद्दीन अत्तार, रामदास भांडे आदी उपस्थित होते.
---

दापोडी : दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी प्रभाग क्रमांक ३० भाजप-आरपीआय (आठवले) युतीचे उमेदवार संजय ऊर्फ नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंढे, प्रतिभा जवळकर यांच्या प्रचारार्थ राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी कोपरा सभेत भाषण केले.

Marathi News Esakal
www.esakal.com