दुचाकीवरील दोन बहिणी ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी
दुचाकीवरील दोन बहिणी
ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी
पिंपरी, ता. १४ ः भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशी बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वाच्या सुमारास काळेवाडीतील धनगरबाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०) असे मृत बहिणींची नावे आहेत. ऋतुजा दुचाकी चालवत होती, तर नेहा मागे बसली होती. त्या तापकीर चौकाकडून काळेवाडी फाट्याकडे होत्या. ट्रकच्या धडकेमुळे दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने थेरगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ऋतुजाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नेहाचा अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. काळेवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
-----------
आई-वडिलांनी गमावला हक्काचा आसरा अन् हळवा कोपरा
हिंजवडी, ता. १४ : पुनावळेमधील कष्टकरी शिंदे कुटुंबासह गावावर ऋतुजा आणि नेहा यांच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. वयोवृद्ध आई-वडिलांनी हक्काचा आसरा अन् हळवा कोपरा कायमचा गमावला. शिंदे कुटुंबात दोन्ही मुलीच. हे कुटुंब पिठाची छोटी गिरणी चालवायचे. एकीकडे घाम गाळत आणि दुसरीकडे स्वप्ने बघत त्यांनी दोन्ही मुलींना वाढवले. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा, सुख-सोयी बाजूला ठेवून मुलींना शिकविण्याचा एकच ध्यास त्यांनी घेतला. दोघी चिंचवड गावातील माटे हायस्कूलमधून दहावी झाल्या. ऋतुजा ऊर्फ मिलोनीने ताथवडे येथील श्री बालाजी विधी महाविद्यालयातून नुकतेच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. नेहा बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात होती. दोघीही हुशार, कर्तृत्ववान, संस्कारी आणि मनमिळाऊ होत्या.
मुली शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याच्या मार्गावर होत्या. बुधवारीच आई-वडिलांनी दोघींना मतदान प्रक्रियेची माहिती दिली होती, मात्र काळाने घाला घातल्यानंतर त्यांना धक्का बसला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दोन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार झाले तेव्हा असंख्य नागरिक उपस्थित होते. त्यांच्या त्या आईचा आक्रोश काळीज चिरत होता.
स्कूलबसचे मालक हळहळले
बाल वर्गापासून दहावीपर्यंत ज्या बसमधून दोन्ही बहिणी शाळेत जायच्या त्या स्कुलबसचे मालक धनाजी कोयते काही कामानिमित्त मंगळवारी (ता. १३) रात्रीच शिंदे कुटुंबाच्या घरी गेले होते. त्यांना पाहून दोघी बहिणींना आनंद वाटला. त्यांनी आग्रहाने केलेला चहा पीत धनाजी यांनी गप्पा मारल्या. दोघींच्या गुणाचे कौतुक करताना धनाजी यांना अश्रू रोखता आले नाहीत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

