वाहनांच्या आडोशाने मद्यपींच्या पार्ट्या पिंपळे गुरवमधील प्रकार ः खेळासाठीच्या आरक्षित जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनांच्या आडोशाने मद्यपींच्या पार्ट्या
पिंपळे गुरवमधील प्रकार ः खेळासाठीच्या आरक्षित जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष
वाहनांच्या आडोशाने मद्यपींच्या पार्ट्या पिंपळे गुरवमधील प्रकार ः खेळासाठीच्या आरक्षित जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष

वाहनांच्या आडोशाने मद्यपींच्या पार्ट्या पिंपळे गुरवमधील प्रकार ः खेळासाठीच्या आरक्षित जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष

sakal_logo
By

पिंपळे गुरव, ता. १६ ः पिंपळे गुरव येथील बॅडमिंटन हॉल शेजारील मोकळ्या जागेत महापालिकेची खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा आहे. मात्र, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील मोकळ्या जागेत एक प्रकारे वाहनतळच निर्माण झाले आहे. त्या परिसरात मद्यपींच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या आरक्षित जागेत कोणतीही परवानगी न घेता शेकडो वाहने दिवसरात्र पार्क केली जात आहेत. त्यामुळे येथील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास मद्यपींचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहने पार्क केलेल्या अडगळीच्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ठिय्या मांडून, मद्यपान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचा नाहक त्रास परिसरात वास्तव्य असणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

रात्रीच्या सुमारास तर अनेक वाहने पार्क केलेली दिसून येतात. पार्क केलेली वाहने मुख्य रस्त्यावर येत असताना अनेक अपघात घडून आले आहेत. याकडे सांगवी पोलिस प्रशासन हाकेच्या अंतरावर असूनही दुर्लक्ष करीत आहे तर संबंधित महापालिका प्रशासनदेखील काणाडोळा करीत आहेत.

‘सदर जागा आ. क्र. ३४४ व ३४४ ''अ'' खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असून विकसित करावयाचे आहे तरी सदर जागेवर कोणत्याही प्रकारचा राडा रोडा टाकण्यात येऊ नये. अन्यथा वाहन व वाहन मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल’ असा फलकही लावला आहे. तरी देखील कशाचीही तमा न बाळगता वाहनचालक अनधिकृतरीत्या वाहने पार्क करीत आहेत. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता आरक्षित जागेवर अनधिकृतरीत्या वाहने पार्क करणाऱ्यांवर आळा बसविण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


‘‘हे आरक्षण क्रीडा विभागाच्या ताब्यात आहे. क्रीडा विभागाशी बोलून घेतो. पाहणी करून अतिक्रमण विभागामार्फत सांगवी पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करू. तसेच पार्किंगचा विषय असल्याने वाहतूक पोलिस यांना कळवावे लागेल. त्यानंतरच कार्यवाही करता येईल.
- विजयकुमार थोरात, ह क्षेत्रीय अधिकारी

‘‘येथील आरक्षित असलेल्या खेळाच्या मैदानाच्या जागेत वाहन पार्क होत असल्याने दिवसा अपरात्री गैरप्रकार होत आहेत. वाहनांचा आडोसा घेऊन उशिरापर्यंत येथे उघडपणे दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. मद्यपीकडून नशेत शिवीगाळ व गोंधळ घातला जात असल्यामुळे परिसरातील रहिवासी वैतागले आहेत.

संजय मराठे, स्थानिक नागरिक


फोटोः 00577