पेव्हिंग ब्लॉकचा अट्टहास नागरिकांच्या जीवावर

पेव्हिंग ब्लॉकचा अट्टहास नागरिकांच्या जीवावर

Published on

पिंपळे गुरव, ता. ८ ः पिंपळे गुरव परिसरातील डायनासोर उद्यान मार्गे शहीद भगतसिंग चौकाकडे जाताना आदित्य कॉर्नर, कृष्णाई विहार दरम्यान मुख्य रस्त्यावरील पेव्हिंग ब्लॉक जीर्ण झाले असून जागेवरून हालत आहेत. त्याने वाहन चालकांसाठी धोकादायक परिस्थिती तयार झाली आहे. मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा महापालिका प्रशासनाचा अट्टहासाने शालेय विद्यार्थी, पादचाऱ्यांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवीकडून पिंपळे सौदागर, पिंपरी, वाकडकडे जाणारे शाळा- महाविद्यालयाचे विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणारे रहिवासी डायनासोर उद्याना शेजारून आदित्य कॉर्नर सोसायटी समोरील चौक मार्गाचा नेहमी वापर करतात. या मुख्य रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी महापालिकेकडून वरील मुख्य रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. मात्र, मोठ्या रहदारीमुळे हे ब्लॉक आता एकमेकांपासून निखळले असून सुमारे चार ते पाच इंचाचे मोठे अंतर निर्माण झाले आहे. हे ब्लॉक जागेवरून हलले आहेत. वाहने त्यावरुन गेल्यास ते वर-खाली होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तोल सांभाळणे अवघड जात आहे. शेजारीच शाळा असल्याने लहान मुलांना शाळेत सोडताना महिला पालक, ज्येष्ठ नागरिकांना अपघाताची भीती वाटते. याप्रमाणेच वळणावरच पेव्हिंग ब्लॉक जोडणीमध्ये अंतर तयार झाल्याने धोकादायक परिस्थितीत निर्माण झाली आहे. काही दुचाकीस्वारांचा तोल जाऊन छोटे अपघातही झाले असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अद्याप गंभीर अपघात घडला नाही. मात्र, तातडीने निवारण केले नाही; तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. त्यामुळे पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.

अपघाताचा सापळा
पिंपळे गुरव येथील आदित्य कॉर्नर चौक पेव्हिंग ब्लॉकची सद्यस्थिती ही नागरिकांच्या जिवाशी खेळणारी असून तातडीने लक्ष घालून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा हा रस्ता अपघाताचा सापळा ठरणार, यात शंका नाही.
पेव्हिंग ब्लॉक नीटपणे बसवून रस्त्यावरील धोकादायक अंतर काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

प्रमुख चौकातच अट्टहास ?
शहरातील अनेक ठिकाणी महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत. परंतु, जेथे जास्त रहदारी आहे. नागरिकांची वर्दळ असते, अशाही रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. वाढत्या रहदारीने पेव्हिंग ब्लॉक वरचेवर खचत असतात किंवा निखळत असतात. त्यामुळे त्याची वरचेवर दुरुस्तीही करावी लागते. प्रमुख रहदारीच्या रस्ते आणि चौकांमध्ये हे ब्लॉक बसविण्याऐवजी त्यांचे डांबरीकरण करणे अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करणे अधिक गरजेचे ठरत आहे.


पिंपळे गुरव येथील आदित्य कॉर्नर सोसायटी समोरील पेव्हिंग ब्लॉकची पाहणी करून ते पुन्हा योग्य पद्धतीने बसविले जातील.
- सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय

PMG25B02777

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com