सांगवी पोलिसांकडून अनाथ मुलांसमवेत ‘माणुसकीची दिवाळी’

सांगवी पोलिसांकडून अनाथ मुलांसमवेत ‘माणुसकीची दिवाळी’

Published on

पिंपळे गुरव, ता. २५ ः आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले असताना सामाजिक बांधिलकीचे बंध जपण्याचे उदाहरण सांगवी पोलिसांनी घालून दिले. सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनाथ मुलांसोबत खऱ्या अर्थाने ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी केली.
सांगवी हद्दीतील विविध अनाथालयांतील लहान मुलांना पोलिस ठाण्याच्या परिसरात आमंत्रित करून सकाळपासूनच आनंदमयी वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी मिळून मुलांसाठी संगीत, खेळ आणि भेटवस्तूंची खास मेजवानी उभी केली. याप्रसंगी मुलांना मिठाई, नवीन कपडे, चप्पल, फटाके आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. पोलिस अधिकाऱ्यांसमवेत मुलांनी पणत्या प्रज्वलित केल्या. फुलबाज्या उडविल्या आणि दिवाळीचा उत्सव आनंदाने साजरा केला. काही क्षणांसाठी का होईना, सांगवी पोलिस ठाणे हे त्यांना त्यांच्या छोट्या घरासारखे वाटले. अनाथ मुलांच्या चेहऱ्यांवरील हसरे भाव पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. प्रत्येक मुलाच्या डोळ्यांतील आनंद पाहून पोलिस कर्मचाऱ्यांच्याही मनात समाधानाची भावना दाटून आली.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सांगवी पोलिस ठाण्याने दाखविलेली ही माणुसकीची दिवाळी समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी ठरली.
दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद पोहोचावा हीच आमची इच्छा आहे. या मुलांसोबत साजरी केलेली दिवाळी आमच्याही आयुष्यभर लक्षात राहील.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com