नाव स्वच्छतेचे, काम मात्र ‘धूळ’फेकीचे

नाव स्वच्छतेचे, काम मात्र ‘धूळ’फेकीचे

Published on

पिंपळे गुरव, ता. २१ : स्मार्ट सिटीच्या स्वप्नांवर प्रत्यक्षात ‘धूळ’ फेकणारे वास्तव उघड झाले आहे. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून ‘स्वीपिंग मशीन’ वाहन फिरविले जाते. पण, प्रत्यक्ष परिणाम निराशाजनक असल्याचे पिंपळे गुरव परिसरात समोर आले आहे. त्यामुळे यंत्रणेच्या कामाबाबत शंका व्यक्त होत आहे.

‘स्वीपिंग मशीन’मुळे शहर चकचकीत होईल आणि रस्त्यांवरील धूळ-माती शिल्लक राहणार नाही, असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिले होते. तेच यंत्र प्रत्यक्षात कचरा खेचण्याऐवजी धूळ उडविताना दिसत आहे. पुढे स्वच्छतेचा आभास आणि मागे रस्त्यावर वाढलेली धूळ व कचऱ्याचा पसारा असे विरोधाभासी चित्र नागरिकांच्या डोळ्यांसमोर उघड झाली आहे.
‘स्वीपिंग मशीन’वर एक ऑपरेटर आणि एक क्लिनिंग लेबर अशी दोनच माणसे तैनात असतात. मात्र, कचरा खरोखर गोळा होतोय, की फक्त रस्त्यावर धूळफेक होतेय, याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसते. मशिनवर पाण्याचे चार ‘स्प्रे नोजल’ बसवलेले असले, तरी प्रत्यक्षात त्यापैकी एक-दोनच सुरू असल्याचे आढळले. परिणामी, धूळ आटोक्यात येण्याऐवजी हवेत मोठ्या प्रमाणात उडत आहे, असे नागरिक सांगत आहेत.


रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण जैसे थे
पिंपळे गुरव परिसरात महापालिकेकडून ‘स्वीपिंग मशीन’ तैनात असून, दररोज एकच वेळा झाडणकाम केले जाते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण जैसे थे असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा प्रकल्प कितपत परिणामकारक ठरतो आहे, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मशीन पुढे धावत असली तरी धूळ तशीच जागेवर उडताना दिसते. कडेकोपरे व्यवस्थित स्वच्छ न होता अनेक वेळा केवळ मशीन रस्त्यावरून फिरताना दिसणे, हे वास्तव नागरिकांना अनुभवास येत आहे.

‘स्वीपिंग मशीन’द्वारे रस्ते सफाईच्या पद्धतीत मोठा बदल करत आहोत. आता दिवसाऐवजी रात्री स्वच्छता केली जाईल. तसेच, पाणी वापरणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. झाडणकामावेळी पाणी न वापरणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याशिवाय, प्रत्येक स्वीपिंग गाडीबरोबर महापालिकेचा एक कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात येत आहे.
- प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘स्वीपिंग मशिन’ ठेकेदारांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुणवत्ता तपासणीसाठी आपण दक्षता पथक नियुक्त करत आहोत. स्वच्छता करताना पाण्याचा वापर न झाल्याचे आढळल्यास संबंधितावर तत्काळ जागेवरच कारवाई करण्यात येईल.
- अमित पंडित, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग

मशीन स्वच्छतेपेक्षा धूळच जास्त उडवत आहेत. खरोखर साफसफाई केली जातेय का, की आमच्या स्मार्ट सिटीच्या स्वप्नांवरच महापालिका धूळ फेकत आहे, हे नागरिकांना समजत नाही.
- तोफीक सय्यद, स्थानिक नागरिक, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com