दिव्यांग मुलांच्या जीवनातील पहिली आनंदी धाव
पिंपळे गुरव, ता.९ ः जन्मजात व्यंगामुळे ज्या चिमुकल्या पावलांना नीट उभे राहणेही कठीण होते, तीच पावले धावण्याच्या शर्यतीत धावताना आणि बेडूक उड्या मारताना पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कधीकाळी आपले बाळ कधी चालू शकेल का ? या चिंतेत दिवस काढणाऱ्या पालकांसाठी हा कार्यक्रम नव्या आयुष्याची आशादायी पहाट ठरला.
निमित्त होते जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) आणि क्युअर इंडिया या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात आयोजित बालक-पालक स्नेहमेळाव्याचे. या मेळाव्यानिमित्त आयोजित विविध खेळांत दिव्यांग मुलांनी भाग घेतला. त्यावेळी हा हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला.
या स्नेहमेळाव्यात क्लबफूटग्रस्त आजारावर यशस्वी मात केलेली २ ते १८ वर्षे वयोगटातील २५ मुले सहभागी झाली. धावण्याची शर्यत, सरळ रेषेत चालणे, बेडूक उड्या मारणे अशा विविध खेळांमध्ये मुलांनी उत्साहाने भाग घेत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. अनिल संतपुरे यांनी क्लबफूटवरील उपचारांमध्ये लवकर निदान व सातत्यपूर्ण उपचारांचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांचा संयम आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला बालरोगतज्ञ डॉ. सुरेखा चावरिया, डॉ. सुचित्रा खेडकर, डॉ. संध्या सिसोदिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बिराडे, डॉ. अमित बनशेट्टीवार, डॉ. विठ्ठल शिंदे, मनीषा येडसे आणि डॉ. रविंद्र चौधरी यांची उपस्थिती होती. नूतन गायकवाड आणि डॉ. मिनाक्षी हबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. खेळ, गप्पा आणि अल्पोपहारासह प्रत्येक बालकाला भेटवस्तू देण्यात आल्या.
बालकांना नवजीवन
या केंद्रातून आतापर्यंत १५६ क्लबफूटग्रस्त बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. येथे ‘पोनसेटी’ पद्धतीद्वारे उपचार केले जातात. पालकांचे समुपदेशन, ५ ते ६ आठवड्यांचे सिरीज कास्टिंग आणि त्यानंतर फूट अबडक्शन शूज देणे अशा सर्व सेवा येथे विनामूल्य पुरविण्यात येतात.
जेव्हा आमच्या बाळाला हा आजार असल्याचे समजले, तेव्हा आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. आज आमची मुले धावताना पाहून ऊर भरून येतो.
- साक्षी विधाते, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

