
वीरमाता, वीरपत्नीचा थेरगावमध्ये सन्मान
पिंपरी, ता. २५ : कै. मोरू महादू बारणे क्रीडांगण वनदेवनगर, थेरगाव या ठिकाणी सैनिक युवा फोर्स सोल्जर ॲकॅडमी यांच्यावतीने २२ जानेवारी रोजी सेना दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वीरमाता, वीरपत्नी यांचा हळदी-कुंकू कार्यक्रम घेत सन्मान करण्यात आला.
सोशल हॅंड्स फाऊंडेशनकडून साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, गॅलेक्सी किड्स स्कूल, एस. पी. इंग्लिश मीडियम स्कूल, जर्म्स न पर्ल्स स्कूल, ऑर्किड इंग्लिश मीडियम स्कूल, संचेती हायस्कूल व इतर शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांच्यावतीने संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष कर्नल विजय वेसवीकर व रिटायर्ड के. ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड इंदुप्रकाश मेनन, मदनलाल धिंग्रा यांचे वंशज जगमोहन धिंग्रा, सैनिक युवा फोर्सचे संचालक रामदास मदने, कारगिल सहभाग उपसंचालक अशोक जाधव, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, एन. एस. जी कमांडो चंद्रकांत कडलग, ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मोहनिश बारिया, कृषी पुरस्कार विजेते कैलास जाधव, सेनेतील निवृत्त पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सेना दिवस २४ मराठा लाइट इन्फंट्री मिलिटरी बँडसह साजरा करण्यात आला. कर्नल विजय वेचवीकर यांनी परेडची सलामी घेत निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांनी योगा, लेझीम, लाठीकाठी, तलवारबाजी प्रात्यक्षिके दाखवली. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांना प्रशस्तिपत्रक व मेडल देण्यात आले. जागतिक विक्रमवीर प्रशांत विजय ऊर्फ कवी प्रवि यांनी तिरंगा यही मजहब हमारा सादर करून, सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. सुभद्रा फाउंडेशनच्या माधवी जनार्दन यांनी सूत्रसंचालन केले. सैनिक युवा फोर्सचे संचालक रामदास मदने यांनी आभार मानले.