वैष्णवमाता शाळेला एक कोटींचे पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णवमाता शाळेला एक कोटींचे पारितोषिक
वैष्णवमाता शाळेला एक कोटींचे पारितोषिक

वैष्णवमाता शाळेला एक कोटींचे पारितोषिक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः शालेय, आंतरशालेय, शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ उपक्रम राबविण्यात आला. त्यात सहभागी महापालिकेच्या १२९ शाळांमधून भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णवमाता विद्यालयाने एक कोटी रुपयांचे ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल शाळा’ पारितोषिक पटकावले. अन्य सात शाळांनी प्रत्येकी पन्नास लाखांचे ‘मॉडेल्स स्कूल’ पारितोषिक मिळवले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करण्यासाठी, तसेच शाळेच्या मानकांचे आणि सर्वोत्तम पद्धतीचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रम मंगळवारपासून (ता. २४) ऑटो क्लस्टर येथे आयोजित केला होता. त्याअंतर्गत बुधवारी (ता. २५) महापालिका प्रशासक शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांच्या हस्ते ‘मॉडेल्स स्कूल’ ठरलेल्या शाळांना व विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. मॉडेल्स स्कूलच्या प्रतिनिधींना धनादेशाच्या प्रतिकृती देण्यात आल्या. प्रत्यक्ष धनादेश नंतर दिले जाणार आहेत.

विजेत्या मॉडेल्स स्कूल
भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णवमाता विद्यालयाने एक कोटी रुपयांचे पारितोषितक पटकावले. प्रत्येकी पन्नास लाखांचे पारितोषिक मिळवणाऱ्या मॉडेल्स स्कूलमध्ये चिंचवड स्टेशन येथील फकीरभाई पानसरे उर्दू विद्यालय, चऱ्होलीतील काळजेवाडी प्राथमिक शाळा, चिखली सोनवणेवस्ती प्राथमिक शाळा व पिंपरीतील संत तुकारामनगर मुलांची प्राथमिक शाळा यांचा समावेश आहे. अन्य तीन मॉडेल्स स्कूल चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या शाळा आहेत. सध्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने तेथील शाळांची नावे जाहीर केली नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित तीन मॉडेल्स स्कूलची घोषणा केली जाणार आहे, असे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

अशी झाली मॉडेल्स स्कूलची निवड
जल्लोष शिक्षणाचा उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शाळा स्तरांवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात महापालिकेच्या सर्व शाळांनी सहभाग घेतला. आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातून अर्थात झोनमधून एक सर्वोत्कृष्ट शाळा निवडण्यात आली. शालेय आव्हानांच्या निकषांवर एक सर्वसमावेशक रेटिंग दिले गेले. त्यातून एका झोनमधून एक मॉडेल स्कूल निवडण्यात आली आहे. त्यात ८९ निकष पूर्ण करणारी वैष्णवमाता विद्यालय सर्वोत्कृष्ट ठरले. जल्लोष उपक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. त्यसाठी ६७ शाळांची निवड झाली होती. शिवाय, प्रदर्शन, विविध प्रकारचे गेम झोन, ग्रंथालय, बुक स्टॉल, फुड स्टॉल, जादूचे प्रयोग, पपेट शो झाले. शिक्षकांसाठी स्पर्धा झाली. स्टुडंट चॅलेंज स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
महापालिका व खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मॉडेल्स तयार केले होते. त्यांचे प्रदर्शन मांडले होते. ते पाहण्यासाठी अनेक शाळांचे विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्री शूट केले. विद्यार्थिनींनी केलेल्या नृत्याने अनेकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या ठिकाणी दर्शनी भागात आकाश कंदिलांची केलेली सजावट लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग शिक्षकांनी मजावून घेतले.
---