इंद्रायणी प्रदूषण; ६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नदीत रसायुनयुक्त पाणी सोडण्याचे कारण; महापालिका जलनिःसारण विभागाची फिर्याद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणी प्रदूषण; ६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा
नदीत  रसायुनयुक्त पाणी सोडण्याचे कारण; महापालिका जलनिःसारण विभागाची फिर्याद
इंद्रायणी प्रदूषण; ६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नदीत रसायुनयुक्त पाणी सोडण्याचे कारण; महापालिका जलनिःसारण विभागाची फिर्याद

इंद्रायणी प्रदूषण; ६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नदीत रसायुनयुक्त पाणी सोडण्याचे कारण; महापालिका जलनिःसारण विभागाची फिर्याद

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांद्वारे कंपन्यांतील रसायनयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या प्रकरणी चिखली परिसरातील सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे फिर्याद दिली आहे.
शहराच्या उत्तर सीमेवरून इंद्रायणी नदी वाहते. तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून चऱ्होलीपर्यंत नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात कंपन्या आहेत. शिवाय, भोसरी ‘एमआयडीसी’तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीकडे प्रवाहित होते. नैसर्गिक नाल्यांद्वारे ते नदीला मिळते. मात्र, काही कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे तपासणी आढळून आले. अशी कंपन्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.

असा आढळला प्रकार
नाल्यांद्वारे नदीत रंगीत पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार जलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांच्या पथकाने पाहणी केली असता, सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्‍यांतील सांडपाणी वाहिन्या घरगुती सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे आढळून आहे.

कायदा काय सांगतो?
निवासी भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने भूमिगत वाहिन्या टाकल्या आहेत. त्याद्वारे केवळ घरगुती सांडपाणीच वाहून नेले जाते. त्यामध्ये कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडण्यास कायद्यानुसार मनाई आहे. असे आढळल्यास महापालिका अधिनियम १८६ (१) (फ) नुसार गुन्हा ठरतो. त्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे आढळले दोषी
मारुती लोंढे (क्वालिटी कोटिंग वर्क्स, शेलारवस्ती), कुमार मोहन प्रजापती (डायनामिक प्लास्टिक इंडस्ट्रीज), मोरेश्वर मुंगसे (ओम इंडस्ट्रीज), सचिन साठे (वरद इन्फोटेक), सुरेश अग्रवाल (हरिदर्शन प्रा. लि.), विश्वेश देशपांडे (टेक्सेव्ही मॅकेनिकल) यांनी कंपन्यांतील सांडपाणी वाहिन्या महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडल्याचे निदर्शनास आले आहे.

महापालिकेचा इशारा
इंद्रायणी नदीच्या काठी भराव करून अनधिकृत शेड, इमारती बांधण्याचे काम बेकायदेशीरपणे चालू आहे. सदर विनापरवाना बांधकामे, शेड बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात येईल. तसेच विनापरवाना बांधकाम तोडण्यात येतील. नागरिक, उद्योजकांनी कोणत्याही प्रकारचे विनापरवाना बांधकाम करू नये. बांधकाम करण्यापूर्वी रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल.

काय करायला हवे
- महापालिकेच्या सांडपाणी वाहिनीला (ड्रेनेज लाईन) कोणत्याही मिळकतीचे ड्रेनेज कनेक्शन करण्यापूर्वी नोंदणीकृत प्लंबरच्यामार्फत नागरी सुविधा केंद्रामध्ये परवानगी घेणे आवश्यक
- महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये रासायनिक सांडपाणी जोडणे बेकायदेशीर

हेही आढळले
- पूर रेषेत कंपन्या आहेत
- नदी पात्रालगत भराव
- अनधिकृत बांधकामे

सुरू असलेली कार्यवाही
- कोणतीही प्रक्रिया न करता कंपन्यांमधील सांडपाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांत सोडत असल्याबद्दल पर्यावरण कायद्याचे अनुषंगाने उद्योजकांना पर्यावरण कायद्यान्वये नोटीस दिल्या आहेत.
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या भागात भेट देवून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
- क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी उद्योजकांना अनधिकृत व
विनापरवाना बांधकामाचे अनुषंगाने सदर विनापरवाना बांधकामे काढून टाकण्यासाठी नोटीस दिल्या आहेत.

इंद्रायणी नदी व एमआयडीसी परिसरात पुढील आठवड्यातसुद्धा तपासणी केली जाणार आहे. महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांमधून गळती होत असलेली ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम जलनि:सारण विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे.
- रामदास तांबे, सहशहर अभियंता, जलनिःसारण विभाग, महापालिका
---