
इंद्रायणीवरील आंबी पूल नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ४ : इंद्रायणी नदीवरील आंबी पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला नसताना देखील नागरिक व वाहनचालक गेली आठ ते दहा दिवसांपासून सर्रासपणे वाहतुकीसाठी या पुलाचा वापर करीत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार असून त्यावर खडी, दगड पसरले आहेत. दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रात्रीच्यावेळी एखादे वाहन थेट नदी पात्रात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान पुलाच्या कडेला बांधकाम विभागाने पुलाच्या पोचमार्गाचे काम चालू असून पुलावरून कोणीही वाहन नेऊ नये, असा सावधान फलक लावला आहे. याकडे दुर्लक्ष करून नागरिक पुलावरून वाहतूक करीत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षण सीमा भिंतीचे काम अद्याप झाले नाही. तसेच आंबी गावातील दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी पुलाच्या भरावाच्या जवळ जमा होत असल्याने वाहनचालकांना कसरत करीत जावे लागत आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक टेम्पो, शाळकरी लहान मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, विद्यार्थी सुसाटपणे जात आहेत. आंदरमावळातील नागरिकांना व आंबी येथील ग्रामस्थांना तळेगांवाकडे ये-जा करण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे आंबी गावाजवळील एमआयडीसी, फ्लोरी कल्चर पार्क तसेच विविध कंपनीतील कामगार आदींनी जवळचा रस्ता असल्याने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
‘‘आंबी पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून दोन्ही बाजूकडील भरावाचे काम बाकी आहे. या कामाची निविदा काढली असून. त्याला मंजुरी मिळताच कंत्राटदारामार्फत भरावाचे काम सुरू होईल. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.’’
- धनराज दराडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वडगाव मावळ