
निर्माल्य नदीत फेकण्याच्या प्रकाराला आळा बसवा
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ राज्यातील विविध प्रकारच्या होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणि कार्यवाही करीत असते. जलप्रदूषण ही मोठी समस्या असताना त्यावर प्रचंड निधी खर्च केला जातो. अनेक मोठमोठ्या कंपन्या आणि सामान्य नागरिकांवरसुद्धा कचरा रस्त्यावर फेकल्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचे दिसते. इंदोरी, मावळ येथे इंद्रायणी नदीवरील जुन्या पुलावरून एका चार चाकीवरील महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावलेल्या वाहनातून दोन इसम चार प्लॅस्टिक पिशव्यांतून निर्माल्य आणि मोठा लाकडी देव्हारा नदीच्या पात्रात टाकताना आढळून आले. एकीकडे शासन सर्व स्तरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागी व्हा स्वच्छता राखा असे आवाहन करीत असते. दुसरीकडे सरकारच्या वाहनातूनच असा कचरा नदीपात्रात टाकून जलप्रदूषण होत असताना नागरिकांनी तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
पत्रपेटीची दुरवस्था थांबवा
फ क्षेत्रिय कार्यालय तसेच तहसील कार्यालय निगडी येथील पत्रपेटीची दुरवस्था झालेली आहे. एकतर मोबाईलमुळे पत्र व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. ज्या काही शहरातील उर्वरित पत्रपेट्या आहेत त्याची वाईट परिस्थिती झाली आहे. लहान मुलांना दाखविण्यासाठी तरी यांची दुरुस्ती करावी. ज्येष्ठ नागरिकांना आजही या पत्रपेट्या उपयोगात येत आहेत. पोस्ट खात्याने याकडे लक्ष द्यावे.
- अमन शिराज शेख, निगडी
विद्युत खांबाच्या कामकाजामुळे धोका
मोरवाडी म्हाडा कॉलनी या भागात मागील सहा महिन्यांपासून पदपथावर विद्युत दिवे नाहीत. ते बसविण्याचे काम कधी होणार हे माहीत नाही. परंतु, विद्युत खांबासाठी जागा खोदून ते बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे खांब बसविण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांना दुखापत होण्याची भीती आहे. त्वरित हे खांब बसविण्यात यावेत.
- शंतनू देशमुख, मोरवाडी