
सोसायट्यांनी डिम्ड कन्व्हेयन्स करावे
पिंपरी, ता. ६ ः गृहनिर्माण सोसायट्यांनी डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे. तसेच, सर्व सोसायट्यांनी लवकरात लवकर सोसायटीची जमीन स्वतःच्या नावे करून घ्यावी, असे आवाहन अॅड. कणाद लहाने यांनी केले. अपार्टमेंटचे परिवर्तन सहकारी गृहनिर्माण संस्थेत करण्याची प्रक्रियाही त्यांनी विशद केली.
पुणे जिल्हा सहकाही गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंद्र महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष सहकार दरबार पिंपळे सौदागर येथे झाला. त्यात लहाने बोलत होते. नाना काटे सोशल फाउंडेशनचे सहकार्य लाभले. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नाना काटे होते. महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि महाराष्ट्र राज्य महासंघाचे तज्ज्ञ संचालक अॅड. श्रीप्रसाद परब प्रमुख पाहुणे होते. साधारणपणे ७५ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे १२५ प्रतिनिधी उपस्थित होते. महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेचे प्रमुख चारुहास कुलकर्णी यांनी गेल्या सहा वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. महासंघाच्या सचिव मनीषा कोष्टी यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. पिंपळे सौदागर परिसरात अपार्टमेंट्सची संख्या जास्त आहे. आपणास सहकारी गृहनिर्माण संस्थांचे फायदे मिळावेत, यासाठी अपार्टमेंटमधील रहिवासी उत्सुक असतात, असेही लहाने यांनी सांगितले.
‘गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका’ विषयावर परब यांनी माहिती दिली. गृहनिर्माण संस्थांनी कायद्यानुसार निवडणुका घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगून त्यांनी रिटर्निंग ऑफिसरच्या प्रशिक्षणासाठी आणि गृहनिर्माण संस्थांच्या सुरळीत कामकाजासाठी विकसित केलेल्या ‘हाउसिंग मास्टर’ अॅपबद्दल माहिती दिली. हे अॅप ‘प्ले स्टोअर’वर निःशुल्क उपलब्ध असून, सर्व सोसायट्यांनी ते डाउनलोड करून वापरावे, तसेच त्यासंबंधीच्या सूचना पाठवून अॅपमध्ये सुधारणा करण्यास मदत करावी, असे आवाहनही केले. पटवर्धन यांनी महासंघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एनए. टॅक्स, टँकरमुक्त सोसायटी बद्दल माहिती दिली. अनेक सोसायट्यांनी आपले प्रश्न व समस्या आधीच कळवल्या होत्या. त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पटवर्धन यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. मंदार सहजे यांनी आभार मानले. चारुहास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
सहकार दरबाराचे फलित
- गृहनिर्माण संस्थांनी कायद्यानुसार निवडणुका घेणे अत्यावश्यक
- संस्थांच्या सुरळीत कामकाजासाठी ‘हाउसिंग मास्टर अॅप’ विकसित
- ‘प्ले स्टोअर’वरून ॲप निःशुल्क डाउनलोड करता येणार
- अॅपमध्ये सुधारणा करण्यास सोसायट्यांच्या सूचना उपयुक्त ठरतील
---