
आचारसंहिता केवळ चिंचवडपुरती
सकाळ इम्पॅक्ट
पिंपरी, ता. ६ ः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांनी जनसंवाद सभा, स्थायी समिती व सर्वसधारण सभा रद्द केल्या होत्या. वास्तविक आचारसंहिता लागू असलेला मतदारसंघ सोडून शहराच्या उर्वरित भागातील विकास कामांसंदर्भात निर्णय घेणे आवश्यक होते. याकडे ‘सकाळ’ने शुक्रवारच्या (ता. ३) अंकात ‘आचारसंहितेता फटका पिंपरी, भोसरीला’ असे वृत्त देऊन लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन प्रशासकांनी पिंपरी व भोसरी विधानसभा क्षेत्रातील महापालिकेशी संबंधित विकास कामांवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान आणि दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणुकीची घोषणा १८ जानेवारीला जाहीर झाली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ती चिंचवड मतदारसंघापुरती मर्यादित असली तरी, त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर झाल्याचे दिसत आहे. कारण, विकासकामांमध्ये लोकसहभाग असावा, या उद्देशाने सुरू केलेल्या जनसंवाद सभा, आर्थिक निर्णय घेणारी महापालिकेची स्थायी समिती आणि त्या निर्णयांना अंतिम मान्यता देणारी सर्वसाधारण सभा आचारसंहितेमुळे प्रशासक शेखर सिंह यांनी रद्द केल्या आहेत.
सभा कशासाठी?
सुरुवातील प्रत्येक सोमवारी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर होणाऱ्या जनसंवाद सभा आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी घेतल्या जात आहेत. विकास कामांत लोकसहभाग वाढावा, त्यांच्या समस्यांचे निराकरण त्वरित व वेळेत व्हावे, हा यामागील उद्देश आहे. मात्र, आचारसंहितेमुळे सभा रद्द केल्या आहेत. तसेच, दर मंगळवारी होणारी महापालिका स्थायी समिती सभा व दरमहा होणारी सर्वसाधारण सभाही रद्द केली आहे. त्यामुळे फेब्रुवारीतील स्थायीसह सर्वसाधरण सभाही होणार नाही. महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात प्रशासक स्थायी समितीसमोर मांडून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणार होते. मात्र, आता अर्थसंकल्पही मार्चमध्येच मांडला जाणार अशी स्थिती आहे, याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते.
आयुक्तांचे परिपत्रक...
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, निवडणूक आयोगामार्फत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्भत, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हाव्यात, यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पोटनिवडणुकीच्या भौगोलिक कार्यक्षेत्रातील विकास कामांवरील आचारसंहितेच्या प्रभावासंदर्भात निवडणूक आयोगाच्या पत्राचे अवलोकन करता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. त्यानुसार,
- निवडणूक जाहीर झालेला मतदारसंघ महापालिकेत समाविष्ट असल्यास आचारसंहिता केवळ संबंधित मतदारसंघ क्षेत्रापुरती मर्यादेत राहील
- पोटनिवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहितेचा अंमल केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादेत राहील
- पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील विकास कामांच्या निविदा काढणे, स्विकारणे व तत्सम बाबी, विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे, प्रस्तावित व चालू विकासकामे पूर्ण करण्याबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत
- एखाद्या विकास कामाबाबतच्या निविदा संपूर्ण महापालिका क्षेत्रास प्रभावित करीत असल्यास अशा कामांवर निर्बंध कायम राहतील