
अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
पिंपरी, ता. ७ : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथून पदयात्रा काढून थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
चिंचवड पोटनिवडणुकीचे निरीक्षक, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेनेचे माजी गट नेते नगरसेवक राहुल कलाटे यांच्यात स्पर्धा होती. दोघांनीही उमेदवारीसाठी जोर लावला होता. मात्र, मंगळवारी सकाळी काटे यांच्या उमेदवारीची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली.
त्यानंतर पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत महादेव मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी सकाळी अकरा वाजता पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रा पिंपळे सौदागर गावात फिरून रहाटणीमार्गे काळेवाडीतून थेरगावातील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात आली. रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पदयात्रेत जोरदार घोषणा देण्यात येत होत्या.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी अजित पवार, कैलास कदम, सचिन भोसले, सचिन खरात, योगेश बहल, अतुल शितोळे, रविकांत वरपे, प्रभाकर वाघेरे आदी उपस्थित होते.
लढत तिरंगी होण्याची शक्यता
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व अपक्ष राहुल कलाटे हे प्रमुख दावेदार रिंगणात आहेत. तर, अपक्ष कलाटे यांचा अर्ज कायम राहिल्यास लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘‘पक्षाच्या दहा इच्छुकांपैकीच एकालाच उमेदवारी मिळावी, अशी आमची वरिष्ठ नेत्यांकडे मागणी होती, ती त्यांनी मान्य केली. सहानुभूती आणि राजकारण हे वेगळे आहे. आम्हीही जाऊन सांत्वन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास झालेला आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणार आहोत. आम्ही सर्वजण ताकदीने काम करू. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राहील, असा आमचा प्रयत्न राहील व महाविकास आघाडी विजयी होईल.’’
- विठ्ठल ऊर्फ नाना काटे
क्षणचित्रे
- पदयात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचा सहभाग
- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पदयात्रेत सक्रिय सहभाग
- राष्ट्रवादीचे पुणे शहर, जिल्ह्यातील नेत्यांचाही सहभाग उल्लेखनीय
- मार्गावर राहुल गांधी, उद्धव ठाकरे व अजित पवार या नेत्यांचे फलक
- पदयात्रेत तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकही सहभागी