
थेरगाव रुग्णालयात गर्भवतींची हेळसांड
पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात एन. टी. स्कॅन मशिन आणि एनॉमली स्कॅन मशिन नसल्याने गर्भवतींना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी त्यांना नाइलाजास्तव खासगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही वैद्यकीय विभाग दुर्लक्ष करत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. याउलट रुग्णालय प्रमुखांनी स्कॅन मशिन सुरू असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र मशिन बंद असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.
थेरगाव रुग्णालयात चिंचवड, थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी भागातील महिला रुग्णांची गर्दी मोठी असते. याबाबत तक्रारदार दीपक खैरनार म्हणाले,‘‘रूग्णालयात स्कॅन मशिन नसल्याने गर्भवतींची मोठी अडचण होते. त्यांना नाइलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागते.
तक्रारीची दखल घेऊन, सुविधा उपलब्ध करून द्यावी.’’
राजश्री शिवाळकर म्हणाल्या, ‘‘मी गुरूवारी थेरगाव रुग्णालयात स्कॅनसाठी गेले होते. मशिन बंद असल्याचे सांगण्यात आले. वायसीएममध्ये जाण्याचा सल्ला दिला.’’
कोट
रुग्णालयातील एन. टी. स्कॅन मशिन, एनॉमली स्कॅन मशिन सुरू आहेत. त्या बंद नव्हत्या. चुकीची माहिती आहे.
-डॉ. अभय दादेवार, रूग्णालय प्रमुख, थेरगाव रुग्णालय
फोटोः 23674