
कलाटे यांच्या माघारीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी प्रयत्नशील
पिंपरी, ता. ९ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत गुरुवारपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते माघार घेण्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहेत.
कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी विनंती पक्षाचे निरीक्षक, आमदार सुनील शेळके यांनी केली. त्यानुसार पवार गुरुवारी रात्री किंवा उद्या (शुक्रवारी) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांनी दिली. तर; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहीर उद्या सकाळी दहाला कलाटे यांच्याशी शहरात येऊन बोलणार आहेत.
अजित पवार यांची आढावा बैठक
अजित पवार यांनी आज माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली. तसेच; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही प्रचाराबाबत नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, अनंत कोऱ्हाळे, संतोष पवार आदी उपस्थित होते.
राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरु आहे. सचिन अहीर उद्या (शुक्रवारी) त्यांच्याशी बोलणार आहेत.
- सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.