
घरोघरी होमिओपॅथी, तत्सम उपक्रम हाती
पिंपरी, ता. १० : वूमेन्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (WICCI ) शुक्रवार (ता. ३) रोजी अधिकृतरीत्या राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेची स्थापना केली. ऑनलाइनद्वारे २२ सदस्यांची समिती बनवली असून घरोघरी होमिओपॅथी आणि तत्सम उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
दहा लाखांहून अधिक लोकांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितींबद्दलचा परिचय, प्रथमोपचार आणि होमिओपॅथीच्या योगदानाबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०२३च्या शेवटपर्यंत प्रशिक्षण पूर्ण होईल. भारतात ६० हजार तर, जागतिक पातळीवर २ लाख ५० हजार महिला या संघटनांच्या सभासद आहेत.
राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. राजेश्वरी रापटा म्हणाल्या, ‘कोविड १९ ची वस्तुस्थिती समोर ठेवून कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सज्ज असलेले राष्ट्र तयार करणे गरजेचे आहे. कोणत्याही दुर्दैवी आपत्तीस किंवा महामारीस तोंड देण्यासाठी कुशल आणि जीव वाचविणाऱ्या पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यांची फौज उभारणे आवश्यक आहे.’