
शहरात फेब्रुवारीतच उन्हाचा चटका
पिंपरी, ता. १० : मागील दोन दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच उन्हाच्या झळा पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना बसू लागल्या आहेत. सध्या शहराचा पारा ३५ अंशावर गेला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने थंडीनंतर कडाक्याचे ऊन जाणवू लागले आहे. आताच नागरिक घामाघूम होत आहेत.
शहरात गेल्या तीन महिन्यात अवकाळीचा तडाखा बसल्यानंतर थंडीचा सामना काही अंशी नागरिकांना करावा लागला. परंतु, बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याने नागरिक सर्दी, खोकल्याने बेजार झाले होते. त्यातच, शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढू लागला आहे. आठवड्याभरापासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी तापमान शहरात ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर, बुधवारी ८ तारखेला व गुरुवारी ९ तारखेला ३४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले होते. शुक्रवारी किमान तापमान (ता. १०) १५ अंश सेल्सिअस होते. तर, गेल्या आठवड्यात किमान तापमान १२ ते १५ च्या आसपास आहे. हा तापमानाचा पारा या महिन्यात ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची चिन्हे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसांत दुपारच्या वेळेत उकाडा जाणवण्यास सुरवात झाली आहे. काही क्षणात पाऊस तर, काही क्षणात उन्हाची तीव्रता अशी परिस्थिती शहरवासीयांनी डिसेंबरपर्यंत अनुभवली आहे. सकाळी दहापासूनच उन्हाचा पारा चढण्यास सुरवात होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक आतापासूनच टोपी, रुमाल, छत्री तसेच, स्कार्फचा वापर करत आहेत. अद्याप मार्च सुरु होण्यास २० दिवस बाकी असूनही, उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने उकाडा वाढण्याची चिन्हे आहेत. किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील, असे हवामान खात्यानेही सांगितले आहे.