भरतीसाठी मैदान नसल्याने गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरतीसाठी मैदान नसल्याने गैरसोय
भरतीसाठी मैदान नसल्याने गैरसोय

भरतीसाठी मैदान नसल्याने गैरसोय

sakal_logo
By

भरतीसाठी मैदान नसल्याने गैरसोय
पोलिस शिपाईपदांची भरती ः कर्मचारी- अधिकाऱ्यांना जावे लागतेय वानवडीला

पिंपरी, ता. १० : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २१६ शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. यासाठीची मैदानी चाचणी सध्या सुरु आहे. मात्र, आयुक्तालयाला स्वतःचे मैदान नसल्याने पुण्यातील वानवडी येथे ही चाचणी घ्यावी लागत आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोज ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उमेदवारांचीही ससेहोलपट होत आहे.
पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाण्यांचा समावेश करून, १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाले. मात्र, साडे चार वर्षे होत आली तरी अद्यापही अनेक समस्या कायम आहेत. पोलिस आयुक्तालयासह मुख्यालयासाठीही प्रशस्त जागा मिळालेली नाही. मैदान उपलब्ध नसल्याने इतर मैदानांचा आधार घ्यावा लागत आहे.
मुख्यालयासाठी देहू, विठ्ठलनगर येथील गट क्रमांक ९७ येथे वीस हेक्टर जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने मैदानाचा प्रश्न कायम आहे.
अशातच पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. २१६ शिपाई पदासाठी १५ हजार १४७ उमेदवारांनी अर्ज दिले. त्यातील १३ हजार ९१६ उमेदवारांनी शुल्क भरले. आयुक्तालयाचे मैदान नसल्याने भरतीतील उमेदवारांची मैदानी चाचणी ३० जानेवारी ते १६ फेब्रुवारी या दरम्यान हडपसर, वानवडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोन येथील मैदानावर घेण्यात येत आहे.
चिंचवडपासून हे अंतर साधारण वीस किलोमीटर आहे. ही चाचणी पारदर्शक व सुरळीत पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची येथे नेमणूक केली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोज ये-जा करावी लागते. भरतीसह इतर उपक्रमासाठीही हक्काचे मैदान असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------
भरती बंदोबस्त

उपायुक्त - २
सहायक आयुक्त - २
निरीक्षक - २१
सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक - २५
कर्मचारी - २००
--------------------

वानवडी येथील मैदान शहरापासून काहीसे दूर असल्याने येण्या जाण्यात वेळ जातो. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे मैदान चांगले असल्याने त्याठिकाणी चाचणी घेण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी स्वतंत्र मैदानाची आवश्यकता आहे.
- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, प्रशासन, पिंपरी-चिंचवड.
------------------