बोगस पदव्या धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा चाप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस पदव्या धारण करणाऱ्या 
कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा चाप?
बोगस पदव्या धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा चाप?

बोगस पदव्या धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा चाप?

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी राज्याबाहेरील विद्यापीठ व नामवंत शैक्षणिक संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करून, पदवी व पदविका घेतात. त्या आधारावर संबंधित अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीची मागणी करतात. मात्र, यापुढे पदोन्नतीसाठी राज्याबाहेरील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थेची पदवी व पदविका ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे बोगस पदवी व पदविका धारण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.
पालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी हे अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, बी-टेक, डीसीई, एमई, एमटेक व अन्य स्वरूपाचे पदवी व पदविका तंत्रशिक्षण दूरस्थ अभ्यासक्रम राज्याबाहेरील अभिमत विद्यापीठ व सेंट्रल पब्लिक विद्यापीठामार्फत पूर्ण करतात. अशा पदव्यांच्या आधारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महापालिकेकडे पदोन्नतीची मागणी केली जाते.

याबाबत विविध प्रकारच्या तक्रारी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्याबाहेरील विद्यापीठामार्फत दूरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे घेतलेली पदवी किंवा पदविका ग्राह्य धरण्याबाबत राज्य शासनाच्या विविध आदेशांचा अभ्यास करण्यात आला. राज्याबाहेरील मान्यता नसलेल्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थेची पदवी किंवा पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असा निष्कर्ष पालिका प्रशासनाने काढला आहे.

राज्याबाहेरील विद्यापीठाची अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र अभ्यासक्रमाची पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, अभ्यासक्रम पदोन्नतीसाठी ग्राह्य मानला जाणार नाही, असा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्याबाबत पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्या निर्णयामुळे नोंदणी नसलेल्या राज्याबाहेरील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदरात पदोन्नती पाडून घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.