हा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी वाल्हेकरवाडीतील प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी
वाल्हेकरवाडीतील प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन
हा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी वाल्हेकरवाडीतील प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

हा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी वाल्हेकरवाडीतील प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : महाविकास आघाडीने कर्जमुक्ती करत शेतकऱ्यांच्या खात्यावर साडे चौदा हजार कोटी रुपये दिले. साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक व रोजगार आणले. गेल्या ८ महिन्यात एक तरी नवीन उद्योग राज्यात आला का? असा प्रश्‍न उपस्थित करत उद्योग क्षेत्रात आजही प्रगती नाही. त्यांचा या सरकारवर विश्‍वास नाही. महाराष्ट्राला मागे खेचण्याचे काम या सरकारने केले. हा लढा देशाच्या लोकशाहीसाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विजयी होणार, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी चिंचवड येथे केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी वाल्हेकरवाडी येथे सभा घेण्यात आली. यावेळी ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, आरपीआय (गवई गट) अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, आरपीआय (खरात गट) सचिन खरात, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शेळके, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार खोक्यावाले व अल्पआयू आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. ४० आमदार व १३ खासदार गद्दार झाले. लोकांमध्ये रोष व आक्रोश आहे. लोकांमध्ये या सरकारविरुद्ध चीड निर्माण झालेली आहे. देशभरात ही गद्दारी कोणाला पटलेली नाही. एवढे घाणेरडे, गलिच्छ राजकारण मी कधी बघितले नाही. लोकांचा व विशेषतः महिलांचा विश्‍वास महाविकास आघाडीवर आहे.’’

अजित पवार म्हणाले, ‘‘बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेना काढली. त्यांच्या काळात दोनदा बंड झाले. त्यावेळच्या गद्दार आमदारांना लोकांनी पाडले. उद्या निवडणुका लागू द्या, यांची काय अवस्था होते ते बघा. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, त्याचा बदला शिवसैनिकांना घ्यायचा आहे. गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपाने फोडाफोडीचे राजकारण देशभरात केले. भाजपला योग्य तर जागा दाखविण्याची ही संधी आली आहे.’’

कोयता गॅंग आधी होती का?
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँग आली आहे. या आधी कोयता गँग होती का? या सरकारचे लक्ष नाही. कायदा व्यवस्था चांगली ठेवा. कॉंग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात हे योग्य नाही. विविध जाती-धर्मात सलोखा बिघडवून स्वार्थ साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

क्षणचित्रे -
- महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी
- ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रश्‍न विचारून वातावरण पेटवले
- घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
- आदित्य ठाकरे यांनी बंडखोर राहुल कलाटे यांचा नामोल्लेख टाळला
- ‘बेडकाचे फुगलेलेपण खरे नसते’, अजित पवार यांची नाव न घेता कलाटेयांच्यावर टीका
फोटोः 24544