नवमतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवमतदार
नवमतदार

नवमतदार

sakal_logo
By

जनतेचे प्रश्न सोडविणारा
आमदार असावा

नवमतदार व तरुणाईच्या अपेक्षा

पिंपरी, ता. १४ ः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४९ हजार ५७९ मतदार वाढले आहेत. त्यात काही स्थलांतरीत तर बहुतांश नवमतदार अर्थात पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या तरुणाईचा समावेश आहे. त्यांच्यामते आपला आमदार कसा असावा? आमदाराकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यातून त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट, क्रीडांगणे, मैदाने, सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, उद्याने असावेत; अभ्यासू, सुजाण, जनतेचे प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यार्थिनी म्हणतात...
मतदान करण्यासाठी खूप उत्सुक आहे. विकासासाठी काम करणारा उमेदवार निवडून यावा. महिला, मुलींसाठी सुरक्षित पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य द्यावे. त्यासाठी काम केले पाहिजे.
- सानिका रुद्रवार

मतदान हा मूलभूत हक्क आहे, हे शाळेपासून शिकत आलोय. आमच्या मताने योग्य उमेदवारास संधी मिळणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत.
- मिहिका गर्ग

लहानपणापासून मतदान प्रक्रिया पहात आले आहे. आपणही कधीतरी मतदान करणार, असे वाटायचे. तो क्षण प्रत्यक्षात येणार आहे. पुढेही मतदान करणार आहे. आनंद वाटतो आहे.
- दीपाली कांबळे

विद्यार्थ्यांसाठी प्रभागात स्पेशल लायब्ररी असाव्यात. स्टडी रुम असल्यास अभ्यास करणे सोपे जाईल. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून विद्यार्थ्यांसाठी अश्या सुविधा अपेक्षित आहेत.
- नंदिनी राजेश
----
विद्यार्थी म्हणतात...
खेळासाठी मैदान असावे. आमच्या पिढीतील मुलांना जागेअभावी कित्येकदा मनासारखे मैदानी खेळ खेळता येत नाहीत. तरुणांसाठी अशा प्रकारच्या सुविधा मिळतील, ही अपेक्षा.
- रिशी राय

मी पहिल्यांदा मतदान करत आहे. तर मला माझा उमेदवाराकडून खूप अपेक्षा आहेत. नव्या उमेदवारांनी जुन्या राजकारण्यासारखे वागू नये. नवीन धोरणात्मक कामे करावीत.
- सागर मस्के

स्थानिक समस्या सोडविणारा आमदार हवाय. मतदार संघात नेमक्या समस्या काय आहेत, याची माहिती त्यांना असायला हवी. अनेक असुविधा, समस्या आहेत. त्या सोडवाव्यात.
- प्रियांशू यादव

चिंचवड मतदारसंघातील जनतेला विकासाची प्रतिक्षा आहे. बिनधास्त काम करणारा आमदार हवाय. नोकरी, शिक्षण आणि नागरी समस्यांचे समाधान करणारा आमदार असावा.
- सार्थक बाराथे
---
खेळाडू म्हणतात...
मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. माझ्यासाठी हा खास क्षण असेल. भावी आमदारांनी नागरी सुविधांवर भर द्यावा. निव्वळ स्वतःच्या प्रभागातील प्रश्‍न सोडवू नयेत.
- अश्फाक तांबोळी

मतदान हा विशेषाधिकार आहे. त्यात देशभक्ती व जबाबदारीची भावना आहे. समाज व देशाचे भविष्य घडवेल, असा उमेदवार असावा. सार्वजनिक वाहतुक सुविधा पुरेशी असावी.
- आदित्य बुक्की
---
नवमतदार म्हणतात...
माहेरी असताना मतदार नोंदणी केली नव्हती. लग्नानंतर पहिल्यांदाच मतदार नोंदणी केली आहे. मतदानाबाबत मनात उत्सुकता आहे. निवडून येणाऱ्यांनी नागरी सुविधांना प्राधान्य द्यावे.
- निलू जगधने, गृहिणी

नवनिर्वाचित आमदार सर्व अनधिकृत, बेकायदेशीर आणि अस्वच्छ कृतींना प्रतिबंध करणारा असावा. समस्या सोडविणारा असावा. सार्वजनिक वाहतुक सुविधा पुरवाव्यात.
- विनय लेले, युवक
--