
मतदानासाठी सुटी किंवा दोन तास सवलत द्या औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचा आदेश
पिंपरी, ता. १६ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीअंतर्गत रविवारी (ता. २६) मतदान होणार आहे. त्यात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी रविवारी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे परिपत्रक सरकारने जारी केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था किंवा आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे सुटी देण्याबाबतचे परिपत्रक जारी केल्याचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने म्हटले आहे. सुटी अथवा सवलत न दिल्यास व मतदाराला मतदान करता न आल्याबाबत तक्रार आल्यास त्या आस्थापणांविरुद्ध कारवाईचा इशाराही दिला आहे.
असे आहेत आदेश
--------------------
मतदान क्षेत्राबाहेरच्यांना सुटी
निवडणूक क्षेत्राबाहेर कामानिमित्त कार्यरत असलेले पण, निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी.
मतदान क्षेत्रात सवलत
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल.