
मोटार चालकाकडून महिलेचे अपहरण
पिंपरी, ता. १६ : उबेर अॅपद्वारे बुक केलेल्या मोटारीतून जात असलेल्या महिलेचे अपहरण केले. चालकाने भरधाव मोटार चालवून दोन ते तीन वाहनांना धडक दिली. कोणीतरी मोटारीवर वीट, दगड फेकून मारल्याने काच फुटून महिला जखमी झाली. सिग्नलला मोटार थांबल्यानंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली. हा प्रकार बाणेर ते पुणे विद्यापीठ सर्कल यादरम्यान घडला.
योगेश लहानू नवाळे असे गुन्हा दाखल केलेल्या उबेर चालकाचे नाव आहे. महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या वानवडी येथे रहायला असून, एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. हिंजवडी परिसरात एका मिटींगसाठी त्या आल्या होत्या. काम संपल्यानंतर उबेर अॅपद्वारे मोटार बुक केली. मात्र, बाणेर येथे मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने जाब विचारला असता, त्याने मोटार भरधाव चालवण्यास सुरवात केली. फिर्यादीने आरडाओरडा केला. यावेळी भरधाव मोटारीने दोन ते तीन वाहनांना धक्काही दिला. त्यानंतर मोटारीवर कोणीतरी वीट व दगड फेकून मारला. यामध्ये मोटारीची काच फुटल्याने फिर्यादी जखमी झाल्या. पुणे विद्यापीठ सर्कलजवळ सिग्नलला मोटार थांबल्यानंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली.
--------------------------