आयटीयन्स रविवारी मतदानाला येणार का? चिंचवड पोटनिवडणूक ः मतदानाच्या टक्केवारीत आयटीयन्सचा टक्का जादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीयन्स रविवारी
मतदानाला येणार का?  
चिंचवड पोटनिवडणूक ः मतदानाच्या टक्केवारीत आयटीयन्सचा टक्का जादा
आयटीयन्स रविवारी मतदानाला येणार का? चिंचवड पोटनिवडणूक ः मतदानाच्या टक्केवारीत आयटीयन्सचा टक्का जादा

आयटीयन्स रविवारी मतदानाला येणार का? चिंचवड पोटनिवडणूक ः मतदानाच्या टक्केवारीत आयटीयन्सचा टक्का जादा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड या भागात आयटीयन्सचे राहण्याचे प्रमाण मोठे आहे. राज्यात सर्वाधिक मतदार व मतदान केंद्र असलेल्या या मतदारसंघातील हे आयटीयन्स मतदार रविवारी (ता. २६) सुटीचा दिवस असल्याने मतदानाला बाहेर पडणार का? हा सर्वच उमेदवारांना प्रश्‍न पडलेला आहे.

नवमतदारांची संख्याही वाढली
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५ लाख ६६ हजार ४१५ मतदान आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख १ हजार ६४८ आहे. तर; महिला मतदारांची संख्या २ लाख ६४ हजार ७३२ आहे. या मतदारसंघात २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत आता या पोटनिवडणुकीत ४९ हजार ५७९ मतदार वाढले आहेत. यामध्ये बहुतांश बाहेरून आलेले व नवमतदार आहेत.

‘विकेन्ड प्लॅन’ झाल्यास मतदान कमी?
चिंचवड मतदारसंघातील ही पोटनिवडणूक येत्या रविवारी (ता. २६) आहे. पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमीच असतो, असा आजवरचा अनुभव आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण मतदानाच्या टक्केवारीत आयटीयन्सचा टक्का जादा आहे. आयटीयन्स थेरगाव, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी या भागातही काही प्रमाणात राहत आहेत. सर्वसाधारणपणे आयटी कंपन्यांचा पाच दिवसांचा आठवडा असतो. कंपन्यांत पाच दिवस प्रचंड कामाचा ताण असल्यामुळे बहुतांश आयटीयन्स शुक्रवारी रात्रीच शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सुटीचे नियोजन आखतात. बऱ्याच वेळा ते राहत्या ठिकाणाच्या बाहेरही जातात. तसेच; शुक्रवारी, शनिवारी रात्री पार्टी झाल्यास, ते रविवारी आरामच करतात. त्यामुळे हा मतदार मतदानाला बाहेर किती पडणार, हा एक प्रश्‍नच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हा विकेन्ड मोठा नाही. जोड सुट्या नाहीत. त्यामुळे फारसे कोणी बाहेर जाणार नाहीत. आयटीयन्स कामावर जाताना व येताना वाहतूक कोंडी व घरी आला तर; कचरा, पाणी, रस्ते या प्रश्‍नात अडकला आहे. हातातून जाणाऱ्या नोकऱ्या, बाहेर जाणाऱ्या कंपन्या, याकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडे, प्रशासनाकडे आम्ही निवेदने दिली. पण; हिंजवडी आयटीपार्कमध्ये साधे चार रस्ते होत नाहीत. २०१८ ला आयटीचे प्रश्‍न सुटणार होते, अद्याप २०२३ मध्ये सुटलेले नाहीत. त्यामुळे आम्हला कायदा कळणारा व आमचे प्रश्‍न सोडवणारा आमदार हवा आहे. ‘आता नाही तर; कधीच नाही’ , अशी परिस्थिती असल्याने यावेळी आयटीयन बाहर पडून निश्‍चित मतदान करतील.
- सुधीर देशमुख, आयटीयन, वाकड.

लॉंग विकेंन्ड नाही व मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे आयटीयन बाहेर गावी जाणार नाहीत. घरीच असतील पण; बहुतेकजण कंटाळ्यामुळे मतदानाला जाणार नाहीत. आमच्या पिंपळे सौदागर येथील रोझलॅन्ड सोसायटीत अडीच हजार सभासद आहेत. त्यापैकी आता सुमारे ८०० ते ९०० लोक राहत आहेत. हे आयटीयन मतदानासाठी पैसे घेत नाहीत. त्यामुळे मतदानाला येण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर दबावही टाकू शकत नाही. त्यामुळे आयटीयन्सचे मतदान कमी होते.
- संतोष मस्कर, संचालक, सर्वा सिस्टिम्स प्रा. लि.

मतदान करण्यासाठी सोसायट्यांमध्ये आम्ही अंतर्गत नोटीस फिरवणार आहोत. ‘कोणालाही करा पण; मतदान करा’ , अशी मतदान करण्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत. मतदान न केल्यास लोकप्रतिनिधींना प्रश्‍न विचारण्याचा आपणाला नैतिक अधिकार राहत नाही. त्यामुळे मतदान केलेच पाहिजे. आपण मतदान करत नसाल तर; आपणाला सोसायटीच्या प्रश्‍नांबाबतही माझ्याकडे येण्याचा अधिकार राहत नाही, असे आम्ही आयटीयन्सना ठणकावून सांगणार आहोत. त्यामुळे आयटीयन्स यावेळी मतदानाला बाहेर पडतील.
हेमंत चव्हाण, आयटीयन व मुख्य प्रवर्तक, विशालनगर रहिवासी सोसायटी संघ.