भरपाई मागणाऱ्या डॉक्टरला रॉडने बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरपाई मागणाऱ्या डॉक्टरला 
रॉडने बेदम मारहाण
भरपाई मागणाऱ्या डॉक्टरला रॉडने बेदम मारहाण

भरपाई मागणाऱ्या डॉक्टरला रॉडने बेदम मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : मोटारीला धडक दिल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या डॉक्टरला ट्रक चालकासह त्याच्या साथीदारांनी रॉडने मारहाण केली. यात डॉक्टरच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना बावधन-भूगाव रस्त्यावर घडली. डॉ. संदीप चक्रधर मेहरे (वय ५०, रा. ओरा व्हिला सोसायटी, बावधन, मूळ- औरंगाबाद) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मोटारीतून जात असताना बावधन-भूगाव रोडवर भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात फिर्यादी यांच्या मोटारीचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी जाब विचारला असता ट्रक चालकाने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर ट्रक चालकाने फोन करून इतर साथीदारांना बोलावून घेतले. एका मोटारीतून आलेले दोन पुरुष व एक महिला यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक
बेकायदारीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने चौघांना अटक केली. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. संदीप ऊर्फ भैया दशरथ तुपे (वय २७, रा. मु. पो. कांदलगाव, ता. इंदापूर), किरण नवनाथ गोरे (वय २६), महेश शिवाजी कुंभारकर (वय २६), रोहन लक्ष्मण लोंढे (वय २२, रा. तिघेही रा. थेरगाव फाटा, डांगे चौक, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व पाचशे रुपयांचे एक काडतूस जप्त केले.

जुनी सांगवीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेला चोरट्याने ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. दीपक बलराम यादव (रा. मोहकरराज पार्क, शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यादव यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील कपाट उचकटून ८८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

भरधाव कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडी येथे घडला. सुभाष दत्तात्रेय साळुंके (वय ५४, रा. बहुळ, ता. खेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र सुभाष साळुंके हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रस्त्याने जात होते. साबळेवाडी गावाजवळ आल्यानंतर वाडेकर यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने जोरात धडक दिली. यामध्ये सुभाष यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बक्षीसपत्र केलेला फ्लॅट परस्पर विकून फसवणूक
बक्षीसपत्र करून दिलेला फ्लॅट परस्पर ‘डीड ऑफ असाईनमेंट’ लिहून देत फसवणूक केली. हा प्रकार पिंपरीगाव येथे घडला. बाळासाहेब प्रभाकर काटे (रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्रह्मदेव बापूराव गायकवाड (वय ३७, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काटे यांनी गायकवाड याला वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. त्याची जाणीव ठेवून गायकवाड याने काटे यांना अपार्टमेंट मधील एक फ्लॅट बक्षीसपत्र करून दिला. त्यांनतर तो फ्लॅट गायकवाड याने काटे यांच्या परस्पर संतोष यशवंत कापसे यांना ‘डीड ऑफ असाईनमेंट लिहून देत काटे यांची फसवणूक केली.

गांजा बाळगणारा अटकेत
गांजा बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई मोशीतील गायकवाड वस्ती येथे करण्यात आली. शोएब शालेशा मकानदार (वय २४, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. शोएब याच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार गायकवाड वस्ती येथील इंद्रायणी नदीच्या पात्राजवळून आरोपीला
ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले.