भोसरीत गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत गुंतवणुकीच्या बहाण्याने 
साडेसात लाखांची फसवणूक
भोसरीत गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

भोसरीत गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडत साडेसात लाखांची फसवणूक केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. सोनू कुमार रमणजी झा (वय २३, रा. मधुबनी, बिहार) व इतर दोन मोबाईल वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शंकर फगूनी मुखिआ (रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी ते स्टार पुंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना एनी डेस्क नावाचे स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर कोणताही परतावा न देता तसेच मूळ मुद्दल न देता फिर्यादी यांची फसवणूक केली.

सासरवाडीत जावयाला कोयत्याने मारहाण
सासरवाडीला पत्नीला आणायला आलेल्या जावयाला सासरा व मेहुण्याने शिवीगाळ करून कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना दापोडीतील सिद्धार्थनगर येथे घडली. सचिन एकनाथ वाघमारे (रा. सांस्कृतिक भवन समोर, सिद्धार्थनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ शंकर कांबळे (वय ५०), राकेश नागनाथ कांबळे (वय ३२, दोघेही रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या पत्नीने स्वयंपाक केला नसल्याने त्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यावरून फिर्यादी यांची पत्नी माहेरी निघून गेली. तिला आणण्यासाठी फिर्यादी सासरी गेले असता त्यांचा सासरा व मेहुणा या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता नागनाथ व राकेश यांनी फिर्यादी जावयाला मारहाण करून डोक्यात कोयता मारला. यामध्ये ते जखमी झाले.

ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ; मारण्याचा प्रयत्न
रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरून एकाने ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांनतर त्यांना तलवारी सारख्या हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली. भालचंद्र हरिभाऊ भालेराव (वय ७०, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी शिरगाव-परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद रमेश गायकवाड (वय ४५, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर दुचाकी धुवत होते. त्यावेळी त्यांच्या गावातील विनोद गायकवाड तिथे आला. रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून विनोद याने भालेराव यांना शिवीगाळ केली. भालेराव यांनी विनोदला घरी जाण्यास सांगितले असता तो घरी जाऊन तलवार घेऊन आला व भालेराव यांना मारण्याचा प्रयत्न केला.

भरदिवसा घरासमोरून दुचाकी चोरीला
भरदिवसा घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना त्रिवेणीनगर चौक येथे घडली. विजय बाळासाहेब मदने (त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दरम्यान, चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.

मोटारीच्या धडकेत दुचाकीचालक जखमी
भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना ताथवडे येथे घडली. रणवीरसिंग परमजितसिंग भाटिया (रा. रजनीगंधा अपार्टमेंट, पिंपरी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वडील दुचाकीवरून ताथवडे चौकातून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या मोटार चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.