
रसवंतीगृहावर किनकनू लागला घुंगराचा आवाज उन्हामुळे थंडगार उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी
पिंपरी, ता. २२ : फेब्रुवारीत उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज कानी पडू लागला आहे. त्यामुळे थंडगार उसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकांची पावले आपोआप पेयाकडे वळू लागली आहेत.
फेबुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उसाला चांगली मागणी असते. उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. उष्णतेच्या पाऱ्याने सध्या ३४ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही आता नागरिकांना असाह्य होऊ लागले आहे.
उन्हाळ्यात शितपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्त करून उसाचा रस व नारळपाणी पिण्यासाठीही गर्दी होत आहे. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होत असल्याने ताज्या रसाला अधिक मागणी आहे. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फ्रेश आणि ताजेतवानेही रसामुळे वाटते. त्यामुळे आजही रस्तोरस्ती उसाच्या रसाची दुकाने लागलेली नजरेस पडत आहेत.
तसेच, विविधरंगी शीतपेयाची व सरबताची दुकाने देखील रस्त्याला लागली असून, नागरिकांची आपसूकच पावले त्याकडे वळत आहेत. नीरा पिण्यासाठीही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, आरोग्याच्यादृष्टीने उसाच्या ताज्या रसाला अधिक मागणी आहे.
--
‘‘उसाच्या रसाच्या दरात काही बदल न झाल्याने १० ते २० रुपयांमध्येच पूर्ण व अर्धा ग्लास रस मिळत आहे. केवळ अनेकजणांना रसामध्ये वापरण्यात येणाऱ्या बर्फाची चिंता असल्याने अनेकजण विनाबर्फाच्या रसाची मागणी करताना दिसत आहेत. उसाचे ८६०३२ हे गोड वाण असललेल्या रसामध्ये लिंबू, आद्रक तसेच अननसाचा वापर, काळे मीठ, जलजीरा, मसाला यामुळे रसाची मागणी वाढली आहे. एका रसवंती चालकास रोज १०० किलो उसाची आवश्यकता असते. शंभरहून अधिक असलेल्या रसवंतीगृहांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
- विठ्ठल साखरे, भोसरी, विक्रेता