
भाडेवाढ होऊनही मीटर कॅलिब्रेशनकडे पाठ गेल्या दहा दिवसांत ८३६ रिक्षांवर कारवाई, दंडवसुलीही सुरू
पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात ऑटोरिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशन (पुन:प्रमाणीकरण) करण्यासाठी मुदतवाढ देवूनही रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरचे कॅलिब्रेशन केले नाही. त्यामुळे, १३ फेब्रुवारी २०२३ पासून ८३६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या रिक्षाचालकांकडून प्रत्येकी दिवसाप्रमाणे ५० ते ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. परिणामी, पुन्हा एकदा रिक्षा चालकांनी मीटरवर रिक्षा चालविण्यातून पळवाट काढली असून, कॅलिब्रेशनचाही भुर्दंड कशाला सोसायचा या मानसिकतेपोटी कॅलिब्रेशन करत नसल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत मीटर कॅलिब्रेशन न केल्यामुळे रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तीन आसनी रिक्षांसाठी १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेदरवाढ लागू झाली आहे. प्रत्येकी दीड किलोमीटरमागे ही भाडेवाढ देण्यात आली आहे. मीटरमध्ये २१ रुपयांऐवजी २३ रुपये भाडे पडावे तसेच स्वयंचलित पद्धतीने भाडेवाढीची माहिती प्रवाशांनाही दिसावी, यासाठी रिकॅलिब्रेशन केले जात आहे.
सुधारित भाडेदर लागू झाल्यानंतर मीटर पुन:प्रमाणिकरण करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ६१ दिवसांची मुदत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिली होती. बहुतांशी, रिक्षाधारकांनी भाडेमीटरचे कॅलिब्रेशन व मीटर तपासणी केली नाही. त्यानंतर, रिक्षाचालक व संघटनांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ अशी एकूण ९२ दिवसांची मुदतवाढ पुन्हा दिली. तरीही, रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन करण्याकडे पाठ फिरवली आहे. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत ऑटोरिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे, १ फेब्रुवारी २०२३ पासून कॅलिब्रेशन न केलेल्या चालकांचा परवाना निलंबन करण्यात येणार असून, प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन व किमान ७ दिवस आणि कमाल निलंबन कालावधी ४० दिवसांचा केलेला आहे.
---
आकडेवारी
मीटर कॅलिब्रेशन पासिंग रिक्षा : ८३६
नोंदणीकृत परवानाधारक रिक्षा : ३०,६४५
मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दंड : ५० ते ५०० रुपये
कमाल तडजोड शुल्क : २ हजार रुपये
कॅलिब्रेशनसाठी एजन्सी नेमणूक : चार
--
कोरोनानंतर व्यवसाय आता कुठेतरी सुरळीत झाला आहे. त्यानंतर रॅपिडो बंद झाली. व्यवसायाला काहीशी चालना मिळाली. आणखी एक महिन्याची सवलत आम्हाला हवी आहे. पिंपरी- चिंचवडला मीटरप्रमाणे भाडे आकारले जावे. काही ठिकाणी शेअरिंगवर ऑटो चालते. त्यामुळे कॅलिब्रेशन रिक्षाचालक करत नाहीत. कामगारवर्गाला मीटरप्रमाणे भाडे परवडत नाही.
- संतोष उबाळे, बघतोय रिक्षावाला फोरम, महाराष्ट्र अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष
--
१३ फेब्रुवारीपासून ८३६ जणांकडून दंड भरून कॅलिब्रेशन करून घेतले आहे. त्याआधीही रिक्षा कॅलिब्रेशन केलेले आहेत. दिवसाप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. नागरिकांच्या सुविधेसाठी चालकांनी कॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणे आवश्यक आहे.
- मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी- चिंचवड
--