पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडगिरी
पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडगिरी

पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडगिरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : ‘‘देशातील लोकशाहीची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय सामान्य मतदारांनी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित आहे. भाजपला पराभव दिसू लागल्याने भाजप गुंडगिरीवर उतरू लागली आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे,’’ असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. २३) केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ किवळे गावठाण, मामुर्डी, आदर्शनगर, विकासनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागात रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर, सुमन नेटके, बापू कातळे, मनोज खानोलकर आदी सहभागी झाले होते.
पवार म्हणाले, ‘‘या भागात असणाऱ्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्याचे नियोजन करण्यात येईल.’’

‘‘भारतीय जनता पक्षाने या मूलभुत समस्येचेही राजकारण केले. पवना धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला त्या पक्षाने विरोध केला. ही योजना पूर्णत्वास जाऊ नये, असे प्रयत्न केले. सामान्यांच्या हालअपेष्टांची कोणतीही जाणीव नसणाऱ्या या पक्षाला पराभूत करण्याचा चंग नागरिकांनी बांधला आहे.’’
- रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस