
गुन्हे वृत्त
पतीच्या त्रासाला कंटाळून
चिंचवडमध्ये पत्नीची आत्महत्या
पिंपरी, ता. २५ : पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना चिंचवड, विद्यानगर येथे घडली.
सोनाली विराज चितारे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे तर विराज अजय चितारे (वय २४, रा. दत्तनगर, रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सोनाली यांच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी पतीने किरकोळ कारणावरून सोनाली यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. मानसिक व शारीरिक त्रास देत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सोनाली यांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
------------------------------
विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
एकाच कंपनीत काम करीत असताना सहकारी महिला कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकड रोड येथे घडला.
पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक भुरके (वय ३०, रा. वाकड), प्रसन्ना चिदानंद (वय ३२, रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या वाकड रोड येथील कंपनीत कामाला असताना या कंपनीतील कामगार प्रतीक याने फिर्यादीशी गैरवर्तन केले. तसेच प्रसन्ना यानेही फिर्यादीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला.
--------------
कामगाराकडून सुरक्षारक्षकाला मारहाण
कंपनीतील कामगारासह त्याच्या साथीदारांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केली. हा प्रकार म्हाळुंगे येथे घडला.
सुरक्षारक्षक ध्रुवकुमार नवलकिशोर तिवारी (रा. निघोजे, ता. खेड, मूळ-बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सुभाष वाघ व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे म्हाळुंगे येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला असून, आरोपीही तेथेच कामाला आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीला मोबाईल चेकिंगमध्ये पकडल्याचा राग आरोपीच्या मनात होता. या रागातून फिर्यादीच्या कंपनीत कामाला असलेला आरोपी व त्याच्या साथीदारांनी म्हाळूंगेतील एचपी चौक येथे फिर्यादीला चामडी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले.
-----------------
पुतणीवर अत्याचार; चुलता अटकेत
अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चुलत्याला अटक केली आहे. हा प्रकार चिंचवड, वेताळनगर येथे घडला.
पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी मुलीच्या चुलत्याला अटक केली आहे. फिर्यादीच्या मोठ्या भावाची चौदा वर्षीय मुलगी फिर्यादीच्या छोट्या भावाकडे सांभाळण्यासाठी होती. दरम्यान, आरोपी चुलत्याने वेळोवेळी अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.
-----------------
कंपनीतून तीन लाखांचा माल चोरीला
कंपनीच्या सीमाभिंतीवरून आत शिरलेल्या चोरट्याने कंपनीतून तीन लाखांचा माल चोरला. ही घटना सावरदरी येथे घडली.
ऐनूल हबीब हारून इनामदार (रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे सावरदरी येथील मेगाई पी सी प्रोजेक्ट्स या कंपनीच्या सीमाभिंतीवरून आत शिरले. बाथरूमजवळील ग्रीलच्या दरवाजातून कंपनीत येऊन तीन लाखांचा माल चोरला.
----------------